

पश्चिम बंगालच्या राजकारणातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री उज्ज्वल बिस्वास यांचे निधन झाले आहे. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे.
उज्ज्वल बिस्वास हे नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी राज्य मंत्रिमंडळातही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र, 2026 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार साधन घोष यांनी त्यांचा पराभव केला होता.
गेल्या काही दिवसांपासून उज्ज्वल बिस्वास यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात मागील 10 दिवसांपासून उपचार सुरू होते. बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच टीएमसीच्या अनेक नेत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली.
दरम्यान, 2026 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उज्ज्वल बिस्वास विविध वादांमध्ये अडकले होते. कृष्णनगरमधील त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात मदत साहित्य जप्त करण्यात आले होते. हे साहित्य गरजूंपर्यंत न पोहोचवता साठवून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली होती. संबंधित प्रकरणात त्यांना 30 दिवस तुरुंगात राहावे लागले. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणातही अटक झाल्याने त्यांचा तुरुंगातील कालावधी 49 दिवसांपर्यंत पोहोचला. पुढे त्यांची पॅरोलवर सुटका झाली.
या संपूर्ण घटनाक्रमाचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांनी केला आहे. उज्ज्वल बिस्वास यांच्या निधनानंतर ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दुःख व्यक्त केले. तसेच त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप भाजपवर केला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'उज्ज्वल बिस्वास यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. सार्वजनिक जीवनात ते माझ्यासाठी एका सहकाऱ्यापेक्षाही अधिक होते. आमचे खूप काळापासून एक घट्ट आणि अतूट नाते होते. माजी मंत्री, आमदार आणि तृणमूल काँग्रेस परिवाराचे एक समर्पित सदस्य म्हणून उज्ज्वल बिस्वास यांनी आपले जीवन पक्षाच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले. त्यांचे निधन ही माझ्यासाठी एक मोठी वैयक्तिक हानी आहे आणि त्यामुळे एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून येणार नाही.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.