

Gokul News : गोकुळ दूध संघाच्या संस्था प्रतिनिधींनी केलेल्या आरोपामुळे गोकुळ दूध संघाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. संघातील नोकरभरतीसाठी आर्थिक गैरव्यवहार केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गोकुळ दूध संघामध्ये नोकरीसाठी युथ बँकेत पैसे भरले की गोकुळमधील नोकरीची नेमणूक पत्र दिली जात होती. याची नेमकी वस्तुथिती काय? ही माहिती खरी आहे का? याची माहिती आम्हाला द्यावी, असे निवेदन दूध संस्था प्रतिनिधींच्यावतीने गोकुळच्या प्रशासक मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे यांना देण्यात आले आहे.
जिल्ह्यात गोकुळ दूध संघात सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध महाडिक गट असा वाद चांगलाच उफाळला आहे. गोकुळमधील जुने नवे वाद उकरून काढून प्रत्येक नेत्यांना खिंडीत पकडण्याचा डाव खेळाला जात आहे. मागील वेळी सत्तेत असलेल्या संचालक आणि सध्याचे सत्ताधारी संचालक यात काही अंशी फरक असला तरी जुन्या आरोपावरून महाडिक गटाला कोंडीत पकडण्याची खेळी सुरु केली आहे.
यातच संस्था प्रतिनिधींनी केलेल्या आरोपामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गोकुळ दूध संघात 2016 ते 2021 या कालवधीत 1138 अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्या भरतीमध्ये प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. त्यावेळी अधिकारी पदासाठी 30 लाख व कर्मचारीपदासाठी 20 लाख रुपये घेतले. त्यासाठी हे पैसे कोल्हापुरातील युथ बँकेंच्या शाखेत पैसे भरल्यानंतर संबंधीत अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला ऑर्डर दिल्या जात होत्या, हे खरे आहे काय, याची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
आम्ही जनावरांचे शाणं, मूत काढून जनावरे पोसली. त्या जनावरांचे दूध काढून संघाला घातले आणि संघ मोठा केला. याच संघाच्या जिवावर नोकर भरतीसाठी जर एवढे मोठे पैसे घेतले असतील, तर त्याची माहिती उत्पादक म्हणून आम्हालाला मिळाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघातून अशा प्रकारे कारभार चालत असेल त्याचीही माहिती उत्पादकांना मिळावी, आतापर्यंत याबाबत माहिती मागितली असता संचालक मंडळाकडून दिली जात नव्हती. आता प्रशासक म्हणून आपण शासकीय अधिकारी आहात. तुम्ही उत्पादकांना माहिती द्या, अशी मागणी केली.
यावर मंडळाचे सदस्य प्रदीप मालगांवे म्हणाले, प्रशासक मंडळ आल्यापासून दररोज एक निवेदन दिले जात आहे. आम्ही संघाचा कारभार सांभाळण्याबरोबर उत्पादकांच्या मागण्याचा विचार करत आहेत. येत्या आठ ते दहा दिवसात माहिती देई असे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवाजी कुडाळकर वरणगे, शशिकांत काकडे, बाबासो सांगले, चंद्रकांत इंगवले, दयानंद यादव, अजित चव्हाण, पुरुषोत्तम साळोखे, विकास मुसळे, आशिष पाटील, विष्ण यादव, उत्तम पाटील, मुस्ताक देसाई, दयानंद यादव, यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.
गोकुळ दूध संघात 2016 ते 2021 या कालवधीत महाडिक गट आणि दिवंगत आमदार पी.एन पाटील यांची सत्ता होती. तर 2021 ते 2026 ही सत्ता संपुष्ठात आणत मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील गटाने गोकुळवर सत्ता आणली . या सत्तेत मागील सत्तेतील संचालक देखील होते. जर मुश्रीफ गटाच्या या नोकरभरतीची माहिती हवी होती. तर मागील पाच वर्ष गोकुळ दूध संघावर सत्ता मंत्री मुश्रीफ गटाची होती. त्यावेळी हि माहिती सहज उपलब्ध झाली असती. मग प्रशासक आल्यावरच ही माहिती आवश्यक का ? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे ही खरचं हा घोटाळ आहे की चिखलफेक याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.