

सुरुवातीला गोकुळ दूध संघातील वाद राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा होता. मात्र, हाच वाद आता व्यक्ती केंद्रित झाला आहे. गोकुळ दूध संघाकडून परस्पर माहिती घेऊन एकमेकाचे बिंग फोडण्यासाठी धडपडत आहे. यातूनच मंत्री हसन मुश्रीफ गटविरुद्ध महाडिक गट असा संघर्ष निर्माण झाला आहे. केवळ संघर्ष सुरू झाला नसून व्यक्तिगत पातळीवर राजकारण पोहोचले आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून गोकुळ दूध संघातील राजकारण चांगलेच तापले आहे. सुरुवातीला महायुती विरुद्ध महाविकास अशी लढत होईल असे चित्र असताना पक्षीय वादाला सुरुवात झाली. महायुतीमध्येच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अंतर्गत लढाईला सुरुवात झाल्यानंतर गोकुळ दूध संघाचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाच घेरण्यासाठी अदृश्य शक्तीने डावपेच आखले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ दूध संघावर प्रशासक आणल्यानंतर सहाजिकच भाजपच्या ताब्यात गोकुळची सत्ता असे म्हणावे लागेल.
मात्र, कोणत्याही परिस्थितीत प्रशासक येऊ नये अशी भूमिका घेतलेली मंत्री हसन मुश्रीफ यांना मुख्यमंत्र्यांनीच धोबीपछाड दिला. पण मुख्यमंत्र्यांना गोकुळ दूध संघाच्या राजकारणात इतका हस्तक्षेप का करावा लागला? याचे उत्तर कोल्हापुरातील अदृश्य शक्तीकडे आहे. प्रशासक आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध कोल्हापुरातील महाडिक गट यांच्यातील अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. इतकेच नव्हे तर महाडिक यांचे जावई विजय ढेरे यांच्या कंपन्यांपर्यंत हे राजकारण पोहोचले आहे. प्रशासक आल्यानंतर महाडिकटाकडून मागील पाच वर्षातील विविध कामासंदर्भातील माहिती मागवली असता दुसरीकडे मुश्रीफ गटाने देखील महाडिक यांच्या जावई यांच्या संदर्भात असणाऱ्या कंपन्यांची माहिती मागवून गोकुळचे राजकारण व्यक्तिगत पातळीवर नेले आहे.
गोकुळ दूध संघावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी मागील पाच वर्षातील गोकुळच्या विविध कामकाज संदर्भातील माहिती मागविली आहे. यापूर्वी संचालकांकडे मागणी केली असता सातत्याने ती माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप यापूर्वी संचालिका महाडिक यांनी केला होता. मात्र मध्यंतरीच्या राजकारणात गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी महाडिक यांनी राज्यपातळीवरून दबाव आणला होता. त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ अध्यक्ष झाले. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गोकुळ दूध संघाच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ विरुद्ध महाडिक असा संघर्ष सुरू झाला आहे.
महाडिक यांनी विविध कामासंदर्भात प्रशासकीय मंडळाकडे माहिती मागवली असता दुसरीकडे मुश्रीफ गटाकडून देखील महाडिक यांचे जावई विजय ढेरे यांच्या कंपन्या असणाऱ्या कोल्हापूर आईस फॅक्टरी, गायत्री कोल्ड स्टोरेज, गोकुळ मिल्क सप्लायर्स या कंपनीची मागील पाच वर्षातील आणि त्यापुर्वीची माहिती मुश्रीफ गटांनी मागवली आहे. याचाच अर्थ मुश्री विरुद्ध महाडिक गटाच्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. यावरूनच मुश्रीफ आणि महाडिक गटाच्या संघर्षाला सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल.
शिवाय महाडिक यांच्याकडे असणारा व्यंकटेश्वरा गुड्स या कंपनीकडे असणाऱ्या वाहतुकी संदर्भातील ठेक्याची माहिती द्यावी अशी ही मागणी मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मागील पाच वर्षाचे राजकारण पाहिले तर आमदार सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांचे सत्ता गोकुळ दूध संघावर आहे. त्यामुळे या सर्व कंपन्यांची माहिती यांच्याकडे पूर्वीपासून आहे. तरीदेखील प्रशासकीय मंडळाकडे मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे. मागील निवडणुकीत या कंपन्यांच्या संदर्भातच प्रचार यंत्रणा राबवून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळवर विजय मिळवला होता. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिल्याच वर्षी या कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला. मात्र, या कंपन्या न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाकडून पुन्हा याच कंपन्यांना ठेका देण्यात आला.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गोकुळमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि महाडिक यांच्यातील संघर्ष नजरेसमोर आला आहे. त्यामुळे आतापासूनच एकमेकांवर कुरघोड्याकरण्याचे षडयंत्र रचले जात आहे. यात नेमकी कोण बाजी मारणार? हे येणारा काळच ठरवणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.