

Maharashtra political news: गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर चार शासकीय सदस्य नियुक्त करण्याच्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक आणि संयोजक अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांचे ‘अराजकवादी’ हे लेबल त्यांच्यावरच लागू होत असल्याचा पलटवार त्यांनी केला.
अभिजीत दिपके यांनी गोकुळ दूध संघाच्या संघर्ष मोर्चातील गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यातून त्यांनी सरकारच्या अध्यादेशावर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. दिपके म्हणाले, “मुख्यमंत्री दुसऱ्यांना अराजकवादी म्हणतात;पण स्वतः एका दूध संघाची निवडणूक हरल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याऐवजी सत्तेच्या जोरावर ‘होस्टाइल टेकओव्हर’ (प्रतिकूल अधिग्रहण) करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेचा कौल पायदळी तुडवून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करणारेच खरे अराजकवादी आहेत.”
ऑक्टोबरमध्ये झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीच्या पॅनेलला १२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, अध्यक्ष निवडीच्या वेळी कोरमचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर सहकारी कायद्यात बदल करून शासकीय सदस्य नियुक्त करण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. या नियुक्त्यांमुळे अध्यक्ष निवडीत बहुमताचे गणित बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर दिपके यांनी सरकार ‘होस्टाइल टेकओव्हर’ करत असल्याचा आरोप केला.
मंगळवारी (ता. ९ नोव्हेंबर) सतेज पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा संघर्ष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो दूध उत्पादक, शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले. यावेळी सरकारच्या शासन नियुक्तीच्या अध्यादेशाविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध नोंदवला.
गोकुळ दूध संघाला असंवैधानिक हस्तक्षेपापासून वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कोल्हापूरकरांना दीपके यांनी सलाम केला. मोर्चाला मिळालेला प्रतिसाद हा सरकारच्या निर्णयाविरोधातील जनभावना असल्याचा संदेशही त्यांनी दिला.
मोर्चादरम्यान आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. “गोकुळच्या माध्यमातून सहकार संपवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. हा निर्णय केवळ गोकुळपुरता मर्यादित राहणार नाही तर भविष्यात ग्रामपंचायत, गृहनिर्माण संस्था आणि इतर सहकारी संस्थांमध्येही अशाच पद्धतीने हस्तक्षेप होऊ शकतो,” असा आरोप त्यांनी केला.
गोकुळ ही राज्यातील महत्त्वाची दूध उत्पादक संस्था असून लाखो दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांचे आर्थिक हित या संस्थेशी जोडलेले आहे. त्यामुळे शासकीय सदस्य नियुक्तीच्या निर्णयावरून सरकार आणि विरोधक याच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. या मोर्चात राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी भाग घेत विरोध दर्शवला. यावेळी संघर्ष मोर्चा सभा आयोजित करण्यात आली होती. काँग्रेसचे खासदार शाहु छत्रपती, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील, शेतकरी नेते राजू शेट्टी, आमदार विश्वजीत कदम इत्यादी नेते यावेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.