

Akola news : महाराष्ट्र विधिमंडळाची पंचायत राज ही ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारी एक महत्त्वाची समिती आहे. या समितीने नुकताच विदर्भातील अकोला जिल्ह्याचा दौरा केला. मात्र, त्यांचा हा दौरा वादात अडकला आहे. पंचायत राज समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांचा भाजप कार्यालयात सत्कार सोहळा घेण्यात आला.
यावेळी समितीचे सदस्य असलेले काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम यांनी भाजपचा सत्कार स्वीकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे ही पंचायत राज समिती भाजपच्या कार्यलयात गेल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले असून या समितीचा कारभार भाजपच्या मार्गदर्शनाखाली पार पडतो का? असा सवाल उपस्थित करीत समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणांत टीका केली जात आहे.
पंचायत राज समितीचा अकोला जिल्ह्याचा दौरा आता चांगलाच वादात सापडला आहे. या दौऱ्यामध्ये समिती अध्यक्षांसह सदस्यांचा भाजप कार्यालयात सत्कार सोहळा घेण्यात आला. हा कार्यक्रम आता वादात सापडला. या कार्यक्रमाचे छायाचित्र प्रसारित करून भाजप झेंड्याखाली पंचायत राज समितीचे कार्य चालते का? असा प्रश्न समाज माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
भाजप कार्यालयात काँग्रेस आमदारांचा सत्कार
अकोला जिल्हा परिषदेचा आढावा पंचायत राज समितीने घेतला. त्यानंतर समितीच्या सदस्यांचा सत्कार सोहळा भाजप कार्यालयात घेण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष आ. संतोष दानवे, सदस्य आ. प्रताप अडसड, आ. विजयसिंह पंडित, आ. विक्रम काळे, आ. डॉ. किरण लहामटे, आ. सदाभाऊ खोत, आ. संजय मेश्राम आदींचा सत्कार करण्यात आला. या समितीच्या अध्यक्षांसह बहुतांश सदस्य भाजप व महायुतीतील मित्र पक्षाचे आहेत. नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे आमदार संजय मेश्राम हे विरोधातील काँग्रेस पक्षाचे असतांनाही त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. समिती सदस्य म्हणून भाजपकडून त्यांनी सत्कार स्वीकारला. याच मुद्द्यावरून आता समाज माध्यमातून टीका होत आहे.
पंचायत राज समिती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारी एक महत्त्वाची समिती आहे. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामीण विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा, आढावा आणि प्रभावी उपाययोजनांसाठी पंचायत राज समिती कार्य करते. विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांची मिळून समिती स्थापन केली जाते.
पंचायत राज समिती समिती जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करणे, शासन निधीचा योग्य वापर झाला आहे का? याची तपासणी करणे, ग्रामीण भागातील अडचणी व तक्रारींवर उपाययोजना सूचवणे व पाहणीनंतर आपले अहवाल व शिफारसी विधिमंडळात सादर करणे आदी कार्य करीत असते. या समितीने नुकताच अकोला जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये समिती अध्यक्ष व सदस्यांनी भाजप कार्यालयात सत्कार स्वीकारल्याने वादाला तोंड फुटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.