

नाशिकमधील नराधम अशोक खरात याचे नवे कारनामे दररोज समोर येत आहेत. अनेक महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आज विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले आहे. सरकारने याप्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाच्या हाती दररोज नवे धागेदोरे लागत आहेत.
SIT च्या प्रमुख IPS तेजस्वी सातपुते या आहेत. आज त्यांनी याप्रकरणी पहिल्यांदाच नागरिकांना आवाहन केले आहे. या गुन्ह्यांविषयी उपयुक्त माहिती आपल्याकडे असल्यास पथकाला देण्यात यावी. तसेच या आरोपीने आपल्या बाबतचा काही अपराध केला असल्यास कृपया आम्हाला संपर्क करावा. आपली ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन सातपुते यांनी केले आहे.
सातपुते यांनी तीन अधिकाऱ्यांच्या नावांसह दोन मोबाईल क्रमांकही जारी केले आहेत. अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपअधिक्षक किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांचा समावेश आहे. तर ९५०३२७०२२४ आणि ७७७५८१६३८९ हे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. या क्रमांकावर संपर्क साधून खरात प्रकरणी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, खरातवर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. एआयटीकडून या प्रकरणाची वेगाने चौकशी केली जात आहे. मात्र, अनेकांची फसवणूक आणि अत्याचार झाल्याचे समोर येत असताना तक्रारी करण्यासाठी महिला पुढे येताना दिसत नाहीत. यापार्श्वभूमीवर तेजस्वी सातपुते यांनी नागरिकांना केलेले आवाहन महत्वाचे मानले जात आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत पहिल्यांदाच या प्रकरणार भाष्य केले आहे. विरोधी पक्षातील आमदारांनी याबाबत स्थगन प्रस्ताव आणत चर्चेची मागणी केली होती. त्यावर फडणवीस यांनी या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध असलेल्यांना सोडणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत विधानसभेत सविस्तर निवेदन करणार असल्याची माहितीही त्यांनी आज सभागृहाला दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.