Mumbai News : मुंबईतील रेल्वे स्थानकावर भोजपूर गाणी वाजवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे ही गाणी रेल्वे प्रशासनकाडूनच छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर ही गाणी वाजवली जात होती. मध्य रेल्वेने मुंबईतील सीएसएमटी, नेरुळ, सानपाडा, वडाळा आणि आंबिवली यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवरील ध्वनिक्षेपकांवरून भोजपुरी गाणी वाजवण्यास सुरुवात केली.
सणाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक गाणी वाजवल्यामुळे प्रवाशांमध्ये आश्चर्य आणि संभ्रम निर्माण झाला. अनेकांनी स्थानक प्रबंधकांकडे विचारणा केली असता, हा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाचा असल्याचे स्पष्ट झाले.
मनसे नेते जितेंद्र पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले कीस "कोणती मागणी नसताना ही गाणी लावायला कोणी सांगितले? छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मराठी भाषा दिवस किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी परवानगी मिळवण्यासाठी अनेक अर्ज करावे लागतात, मग छठसाठी अशी मनमानी का?" असा सवाल केला. पुढील एका तासात ही गाणी बंद झाली नाहीत, तर मनसे स्टाइलने उत्तर दिले जाईल आणि रेल्वेविरोधात 'खळ्ळखट्याक' केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे राजकारण मुंबईत करू नका, असा इशारा दिला आहे. तसेच वडाळा स्थानकावर वाजवण्यात आलेल्या गाण्यांवर नगरसेविका माधुरी मांजरेकर यांनीही तीव्र रोष व्यक्त केला.
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी "महाराष्ट्राचे बिहार करू नका आणि मराठी माणसाचा संयम पाहू नका," अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. रेल्वेने तात्काळ भोजपुरी गाणी बंद करावीत, अन्यथा कार्यालयात घुसून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच शहरातील चौपाट्या आणि तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.