

Civil Aviation Ministry on investigation : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांच्याकडून त्याबाबत सातत्याने आवाज उठविला जात असताना अजितदादांचे पुत्र जय पवार यांनीही बुधवारी पहिल्यांदाच अपघाताबाबत सखोल चौकशीची मागणी केली. त्यानंतर काही तासांतच मोदी सरकारने अपघाताबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
बारामतीतील विमान अपघाताला २१ दिवस उलटले आहेत. त्यानंतर या अपघाताचा तपास सुरू झाला. त्यानंतर पहिल्यांदाच २१ दिवसांनी केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने या अपघाताशी संबंधित महत्वाची माहिती दिली आहे. मंत्रालयाने याबाबतचे निवेदन प्रसिध्द केले असून तपास कधी पूर्ण होणार, याबाबतही संकेत दिले आहेत.
सरकारने म्हटले आहे की, विमान अपघाताचा तपास एअरक्राफ्ट इन्व्हिस्टिगेशन ब्युरो करत आहे. हा तपास सिव्हील एव्हिएशन ऑर्गनायझेशनने निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सुरू आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते. L3 कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) नवी दिल्ली येथील AAIB मध्ये यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे.
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) ला आगीमुळे नुकसान झाले आहे. त्यातून माहिती मिळविण्यासाठी तांत्रिक मदत मागितली गेली आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. एएआयबीचा तपास अवशेषांची तपासणी, ऑपरेशनल आणि देखभाल रेकॉर्ड आणि आवश्यक असल्यास घटकांची प्रयोगशाळेतील चाचणी या तांत्रिक आणि पुराव्यावर आधारित आहे, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
प्राथमिक अहवाल कधी?
तपासाचा अहवाल कधी येणार, याबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. त्यावरही सरकारने सूचक संकेत दिले आहेत. आयसीएओच्या नियमांनुसार, घटनेच्या ३० दिवसांच्या आत एक प्राथमिक अहवाल जारी केला जाईल आणि अंतिम अहवाल योग्य वेळी येईल, असे स्पष्ट करणअयात आले आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारीला किंवा त्याआधीच प्राथमिक अहवाल येऊ शकतो.
कंपन्यांचे ऑडिट
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) २०२५ मध्ये नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर्सचे ऑडिट केले होते. याव्यतिरिक्त, व्हीएसआर व्हेंचर्सचे उड्डाण सुरक्षा प्रणाली, उड्डाण कर्तव्य वेळेच्या मर्यादा, देखभाल, स्टेशन सुविधा ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार त्यातील कमतरता दूर करण्यात आल्या होत्या, अशी माहितीही सरकारने दिली आहे.
बारामतीतील विमान दुर्घटनेनंतर, मंत्रालयाने डीजीसीएला व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष ऑडिट करण्यास सांगितले आहे. हे ऑडिट ०४ फेब्रुवारीला सुरू झाले असून लवकरच पूर्ण होईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. शिवाय, मंत्रालयाने डीजीसीएला व्हीआयपी/व्हीव्हीआयपी ऑपरेशन्समध्ये गुंतलेल्या इतर प्रमुख नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर्स आणि एअरोड्रोमचे विशेष ऑडिट करण्यास सांगितले आहे. हे ऑडिट टप्प्याटप्प्याने केले जात आहेत आणि आवश्यकतेनुसार योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली आहे. सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.