Mumbai : विधान परिषदेतील ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेने(शिंदे गट) त प्रवेश केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पद धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कायंदे यांच्या पक्षांतरामुळे विधान परिषदेतील ठाकरे गटातील आमदारांची संख्या नऊवर आली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकण्यास सुरुवात केली असताना काँग्रेसकडूनही विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पाठोपाठ आता काँग्रेसनं देखील विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. अकोला काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव रवींद्र तायडे यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. त्यांनी थेट हायकमांडला पत्र लिहीत सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते करण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपद जाते की काय याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.
विधान परिषदेमध्ये सध्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे नऊ संख्या बळ आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे देखील नऊ संख्याबळ आहे. तर काँग्रेसकडे आठ संख्याबळ आहे. सध्या देशभरातील वातावरण पाहता ठाकरे गटाचे हे पद काढून घेण्याचा दोन्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते विचार करणार नाहीत असे मानले जात आहे. परंतू, आता काँग्रेस पदाधिकाऱ्याचे विरोधी पक्षनेता पदावर दावा करणारे पत्राची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे.
मनिषा कायंदे(Manisha Kayande) यांच्या पक्षांतरामुळे विधान परिषदेतील ठाकरे गटातील आमदारांची संख्या नऊवर झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील एकजूट अभेद्य राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची शक्यता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे होतंय. परंतु आता काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता पदावर सतेज पाटील यांची नियुक्ती करा अशा मागणीचे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाकडे कोणतेही संवैधानिक पद नाहीये. मित्र पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे दोन संवैधानिक पदे आहेत. तर राष्ट्रवादी पक्षाकड़ं विधानसभेतील विरोधी पक्षनेतेसह उपाध्यक्ष असे दोन संवैधानिक पदे आहेत. येणाऱ्या वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असून नंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होत आहेत.
तायडे काय म्हणाले..?
या पार्श्वभूमीवर काँग्रेस(Congress) पक्ष विरोधी पक्षनेते पद घेवून सामान्य जनतेचा, युवकांच्या, बेरोजगारांच्या आवाज बुलंद करण्याचा अतोनात प्रयत्न करून न्याय देण्याची भूमिका असणार आहे. या विषयांवर गांभीर्यानं विचार करून काँग्रेस नेते सतेज पाटील यांना विरोधी पक्षनेते बहाल करून राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांना आत्मीय बळ वाढवणारे नेतृत्व द्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडं पत्राद्वारे मागणी केलीय. ही मागणी अकोला महानगर काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव रवींद्र बाळासाहेब तायडे यांनी केली.
ठाकरेंकडे आहेत 'ही' महत्वाची पदं...
मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत विदर्भातील विप्लव गोपीकिशन बजोरिया हे विधान परिषदेतील एकमेव आमदार होते. आता मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ 11 वरून नऊपर्यंत खाली आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा विधान परिषदेचे सदस्य आहेत. शिवाय, माजी परिवहनमंत्री अनिल परब हे ठाकरे गटाचे प्रतोद आहेत. मराठवाड्यातील अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत.
ठाकरे गट कायंदेंच्या निलंबनाची मागणी करणार...
आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्याविरोध पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी याकरिता विधान परिषदेचे सभापती यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. या संदर्भात आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील पत्रकारांसोबत बोलताना सांगितले आहे. त्यामुळे 17 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
विधान परिषदेतील संख्याबळ :
भाजप - 22
राष्ट्रवादी काँग्रेस - 9
ठाकरे गट - 9
शिवसेना शिंदे गट - 2
काँग्रेस - 8
अपक्ष - 4
रिक्त जागा - 21
(संयुक्त जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष प्रत्येकी १)
एकूण 78
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.