

Mumbai News: दिल्लीचे पोलिस उपायुक्त (DCP) सुमित झा यांच्या नावाने तयार करण्यात आलेला कथित AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
तक्रारीनुसार, @Bhaijagtap1 या एक्स (X) हँडलवरून दिल्ली पोलिसांचे DCP सुमित झा यांच्याशी संबंधित असल्याचा भास निर्माण करणारा AI-जनरेटेड व्हिडिओ शेअर करण्यात आला. प्राथमिक पडताळणीत हा व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. समाजात संभ्रम निर्माण करणे आणि जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणात PIB Fact Check आणि दिल्ली पोलिसांनी संबंधित व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देत तो पूर्णपणे AI-जनरेटेड आणि बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच DCP सुमित झा यांनी राजीनामा दिल्याचा दावा निराधार असल्याचे सांगत नागरिकांना अशा दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाई जगताप यांनी बनावट व्हिडिओ शेअर करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. त्यांनी हा व्हिडिओ तातडीने हटवून महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही केली.
नवनाथ बन म्हणाले, "जाणूनबुजून खोटी माहिती पसरवून समाजात संभ्रम निर्माण करणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात, मात्र AI-आधारित बनावट व्हिडिओच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करणे स्वीकारार्ह नाही. अशा प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे."
महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0063/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणामुळे AI-जनरेटेड कंटेंटचा गैरवापर, सोशल मीडियावरील दिशाभूल करणारी माहिती आणि तिच्यावर होणारी कायदेशीर कारवाई पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.