

Disha Salian Case Bombay High Court Latest Update : मुंबई हायकोर्टात गेल्या काही दिवसापासून दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात याचिकेवर सुनावणी सुरु होती. या प्रकरणावरील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. यावेळी वकिलांनी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि भोसले यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाचा निकाल लवकर येण्याची शक्यता वाटत असतानाच आता कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान दिशाच्या इंक्वेस्ट पंचनाम्यातील मृतदेहाच्या स्थितीचा उल्लेख, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि घटनास्थळाशी संबंधित बाबींवरून न्यायालयाने सरकारी वकिलांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. दिशाच्या मृतदेहाबाबतच्या हॉस्पिटलमधील पंचनाम्यात तिच्या शरीरावर कपडे नसल्याचा उल्लेख असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने मृतदेहावरील कपडे कोणी काढले आणि संबंधित डॉक्टरांचा जबाब का नोंदवण्यात आला नाही, असा सवाल केला. मात्र, सरकारी वकिलांनी हा पंचनामा घटनास्थळावरील नसून हॉस्पिटलमधील असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी न्यायालयाने महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा हेतू नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. दिशाची हत्या झाली किंवा लैंगिक अत्याचार झाला, असा निष्कर्ष काढायचा नसून, या प्रकरणात प्रत्यक्षात संशय घेण्यासारखं काही आहे का, हे तपासणे महत्त्वाचे असल्याचे न्यायाधीशांनी यावेळी सांगितले.
सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी दिशाच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील काही छायाचित्रे न्यायालयासमोर सादर केली. त्यात मृतदेहावर कपडे असल्याचे छायाचित्रही दाखवण्यात आले. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर न्यायालयाने जखमांबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर सरकारी वकिलांनी दिशा उंचावरून पडताना तोंडावर पडली होती, तिच्या कवटीला फ्रॅक्चर झाल्याचं आणि जबड्याला गंभीर दुखापत झाल्याचं स्पष्ट केले. जानेवारी 2024 मधील जबाबात सतीश सालियन यांनी मुलीने आर्थिक नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला होता.
यावेळी राजकीय नेत्यांबाबत आणि सेलिब्रिटींबाबत विचारण्यात आले असता, ते प्रसिद्ध व्यक्ती असल्याने आपण त्यांना ओळखतो; मात्र ते दिशाच्या संपर्कात होते की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी सांगितल्याचे सरकारी वकिलांनी नमूद केले. दिशाची आई वासंती सालियन यांच्या जबाबातही अशाच स्वरूपाची माहिती असल्याचे सांगण्यात आले.
सरकारी वकिलांनी दिशाचा प्रियकर रोहन राय याच्या जबाबाचाही उल्लेख केला. रोहन हा दिशाच्या सर्वाधिक जवळच्या व्यक्तींपैकी एक होता. त्याच्या जबाबानुसार दिशा तणावाखाली होती आणि दारु प्यायल्यानंतर तिने आत्महत्या केली. वडिलांसोबत झालेल्या वादानंतर ती रोहनकडे राहण्यासाठी आली होती, असंही तपासात समोर आल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. दिशाने आत्महत्येपूर्वी दारुचं किती सेवन केलं होतं, याची माहिती वैद्यकीय अहवालात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय मेडिकल रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचाराच्या खुणा आढळल्या नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
यानंतर आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद सुरू केला. त्यांनी या प्रकरणातील याचिकेच्या आधारावरच प्रश्न उपस्थित केला. यापूर्वीही याच स्वरूपाची याचिका दाखल करण्यात आली होती आणि ती रशीद खान पठाण यांनी केली होती, असा दावा त्यांनी केला. सतीश सालियन यांनी त्यावेळी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती, असंही पासबोला यांनी नमूद केले आहे. आता या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले असून कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता कोर्ट निकाल काय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.