

Aamravti News : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी पाच दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. राज्यातील सर्वच बडे नेते आता प्रचारात उतरले आहेत. महायुतीमध्ये पुण्यातील जागा भाजपने आपल्याकडे घेतली त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला आहे. त्यामुळे वातावरण तापले असतानाच आता अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. यावेळी सरनाईक यांच्या प्रचारसभेत बोलताना 2022 साली केलेल्या शिवसेनेतील बंडाबाबत एकनाथ शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर पदवीधर मतदारसंघात प्रचार करीत आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. आमदार किरण सरनाईक यांच्या प्रचार सभेवेळीच अमरावती शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रीती रेवने यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली. त्याबद्दल एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी अमरावती विधानपरिषद निवडणूक जिंकण्याचा निर्धार एकनाथ शिंदे यांनी केला.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'वेळप्रसंगी राणा दाम्पत्य तुरुंगात गेले पण घाबरले नाही, मी पण तसाच आहे. मी जर धाडस केले नसते तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता, असे म्हणत एकनाथ शिदेंनी शिवसेनेतील (Shivsena) बंडाची आठवण करुन दिली. तो ऐतिहासिक निर्णय होता, म्हणून ते महाविकास आघाडीचे सरकार पडले,' असा टोलाही त्यांनी मविआच्या नेत्यांना यावेळी बोलताना लगावला.
येत्या काळात राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नावर बोलताना, जुनी पेंशन आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी दिलेला शब्द पाळणारा आहे, मी एकदा कमेंटमेंट दिली तर दिली, असे म्हणत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिक्षक हा प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचा घटक आहे. किरण सरनाईक हे शिक्षकांची प्रत्येक कामे करणार, कोणताही निधी कमी पडणार नाही, असे आश्वासनही एकनाथ शिंदेंनी दिले.
बंडखोरांवरील कारवाईकडे लागले लक्ष
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहविचार सभा पार पडली. अमरावती शिक्षण मतदारसंघाची निवडणूक ही राज्यात चांगलीच चर्चेत असून या ठिकाणी भाजपने बंडखोरांना कारवाई केली. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत देशपांडे हे अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.