Bhushan Gavai : न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये एकाच समाजाला प्राधान्य; माजी सरन्यायाधीश गवईंचा 'लेटर बॉम्ब'

Bhushan Gavai Writes to President : आपल्या पत्रात न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिलांच्या प्रतिनिधित्वाकडे दुर्लक्ष होत असल्याचे गवई यांनी म्हटले आहे.
Bhushan Gavai
Bhushan Gavaisarkarnama
Published on: 
Updated on: 

Bhushan Gavai News : सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवरून देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायाधीश नियुक्त्यांमध्ये गुणवत्ता आणि सामाजिक समावेशकतेकडे दुर्लक्ष करून एका विशिष्ट समाजाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तीन पानी पत्र लिहिले असून, यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

गवई यांनी शुक्रवारी (ता. २७) राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनाही पाठवली आहे. आता माजी सरन्यायाधीशांनीच न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी शिफारशी करणाऱ्या कॉलेजियमच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केल्याने न्यायव्यवस्थेतील सामाजिक प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आपल्या पत्रात न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिलांच्या प्रतिनिधित्वाकडे दुर्लक्ष होत असल्याचे गवई यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित विशिष्ट समाजात मोडत नसलेल्या अन्य प्रगत समाजघटकांतील उमेदवारांनाही डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपला कोणत्याही समाजाला विरोध नसून न्यायव्यवस्थेत सर्व समाजघटकांचे संतुलित प्रतिनिधित्व असावे, ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

७१५ न्यायाधीशांच्या नियुक्त्यांचे गणित

२०१८ पासून मार्च २०२५ पर्यंतच्या संदर्भित आकडेवारीनुसार उच्च न्यायालयांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या ७१५ न्यायाधीशांपैकी केवळ २२ अनुसूचित जातींतील, १६ अनुसूचित जमातींतील, ८९ इतर मागासवर्गीय, तर ३७ न्यायाधीश अल्पसंख्याक समाजातील होते. जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील नियुक्त्यांमध्ये प्रगत समाजघटकांचे प्रमाण सुमारे ८० टक्के, तर इतर मागासवर्गीयांचे प्रमाण १४ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचेही गवई यांनी पत्रात नमूद केले आहे.

Bhushan Gavai
BJP Bhandara : 'महायुती सरकारने आमदार खासदारांना महाराष्ट्र लुटायला मोकळीक दिलेय...'; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

शिक्षेस्वरूप बदली झालेल्या न्यायाधीशांना आता बक्षीस?

न्यायाधीशांच्या बदल्यांसंदर्भातही गवई यांनी गंभीर आक्षेप नोंदवला आहे. यापूर्वी दोन वेळा तुलनेने छोट्या उच्च न्यायालयांमध्ये बदली करण्यात आलेल्या एका मुख्य न्यायाधीशाची आता प्रमुख उच्च न्यायालयात नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित न्यायाधीशासाठी जागा उपलब्ध करून देताना एका गुणवंत आणि मेहनती मुख्य न्यायाधीशाची छोट्या उच्च न्यायालयात बदली करण्यात आल्याचा आरोपही गवई यांनी केला आहे. अशा निर्णयांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या न्यायाधीशांचे मनोबल खच्ची होण्याचा धोका असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

कॉलेजियम उत्तरदायित्वापासून मुक्त नाही

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १२४ (२) नुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीचे अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत, याची आठवणही गवई यांनी करून दिली आहे. नियुक्त्यांमध्ये कॉलेजियमच्या शिफारशींना प्राधान्य असले, तरी त्यामुळे कॉलेजियम उत्तरदायित्वापासून किंवा राष्ट्रपती त्यांच्या घटनात्मक कर्तव्यापासून मुक्त होत नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये सामाजिक विविधता राखण्याची जबाबदारी केवळ न्यायव्यवस्थेची नसून सरकार आणि संसदेचीही आहे, असे गवई यांनी स्पष्ट केले आहे. लोकशाहीच्या महत्त्वाच्या स्तंभांपैकी एक असलेल्या न्यायव्यवस्थेत सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Bhushan Gavai
Congress Vs NCP SP : काँग्रेसकडून पवारांच्या राष्ट्रवादीवर गद्दारीचा आरोप; डिलिमिटेशनच्या समर्थनाचा घेतला खरपूस समाचार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.