
Vidarbha News : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.5 जून) समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या महामार्गासाठी तब्बल 61 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तसेच 12 कोटी सिमेंट बॅग आणि 7 लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर 701 किलोमीटरच्या समृध्दी महामार्गासाठी करण्यात आला आहे. या उद्घाटनानंतर काहीच वेळात एक गंभीर आरोप करण्यात आला आहे.
समृध्दी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. सुरुवातीला एकनाथ शिंदेनी गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं. शिंदेंच्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस होते. अजित पवार मागच्या सीटवर बसले होते. समृद्धी महामार्गावरून शिंदेनी काही वेळ गाडी चालवली. त्यानंतर गाडीचं स्टेअरिंग मुख्यमंत्री फडणवीसांनी हाती घेतलं.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी आता समृध्दी महामार्गाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत या प्रोजेक्टमध्ये तब्बल 15 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या त्यांच्या आरोपांमुळे पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारण तापण्याची शक्यता आहे.
सपकाळ म्हणाले,समृध्दी महामार्ग हा भ्रष्टाचाराचं कुरण ठरला असून 55 हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी 70 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वरच्या 15 हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
तसेच त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे. पण जर राज्यातील या सरकारमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्वेतपत्रिका काढण्याचं खुलं चॅलेंजही सपकाळ यांनी फडणवीस सरकारला दिलं आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी पुन्हा एकदा 50 खोके एकदम ओकेचा उल्लेख करत फडणवीसांसह शिंदेंनाही डिवचलं आहे. त्यांनी समृद्धी महामार्गाच्या भ्रष्ट पैशांतूनच 50 खोके एकदम ओकेचा कार्यक्रम झाल्याचं आरोप केला आहे. तसेच समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग म्हटलं आहे.
याचदरम्यान, समृध्दी महामार्गासाठी एकूण किती पैसे लागले, कोणत्या पुलाला किती खर्च आला, प्रत्येक किलोमीटरचा खर्च, शेतकऱ्यांचा भूसंपादनाचे पैसे, कंत्राटदारांना दिलेली रक्कम, महामार्गावर झाडं लावण्याचा खर्च आणि टोलमधून सुरु असलेली वसुली याचा सगळा तपशीलवार लेखाजोखा श्वेतपत्रिकेतून मांडण्यात यावा अशी मागणीही केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी घोडबंदर भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पात 3 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा नवा गंभीर आरोप केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा पडल्यानेच नाईलाजानं या प्रकल्पाची निविदा रद्द करत असल्याचं सरकारला जाहीर करावं लागल्याचं म्हटलं. मात्र,या प्रकल्पाप्रमाणेच समृद्धी महामार्ग प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून फडणवीस व शिंदेंच्या बगलबच्च्यांनी यातून मोठा मलिदा खाल्ला असल्याचा दावा करत सपकाळांनी खळबळ उडवून दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समृध्दी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण सोहळ्यावेळी‘ आम्ही तिघेही एकत्रित गाडी चालवतोय, काही काळजी करू नका. तीन शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही. चांगलं ड्रायव्हिंग आहे. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे. ड्रायव्हींगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे. आम्ही तिघेही तीन शिफ्टमध्ये चालवतोय’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तर अर्धी अर्धी चालवायची अगोदरच ठरलेलं असल्याचा चिमटा शिंदेंनी काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.