

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील वाढता तणाव लक्षात घेता अजित पवारांनी हस्तक्षेप केला.
मंत्री भरत गोगावले, उदय सामंत आणि आदिती तटकरे यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून वाद वाढू नये, अशा सूचना देण्यात आल्या.
या हस्तक्षेपामुळे राजकीय संघर्ष थांबणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Raigad News : रायगड जिल्ह्यात विधानसभेनंतर पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. येथे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावलेंसह शिवसेनेचे आमदार यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. आता हा राजकीय संघर्ष आता थांबायला हवा, अशी अपेक्षा जिल्ह्यात व्यक्त केली जात आहे. अशातच रायगडमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी देखील राजकीय संघर्ष आता थांबायला हवा, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. यात पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी (ता.१२) मंत्री भरत गोगावले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची बैठक घेतल्याचे कळत असून मंत्री आदिती तटकरे यांच्याशीही चर्चा केली आहे.
तटकरे-गोगावले यांच्यातील वाढता तणाव आता शिगेला पोहचला असून दोघांकडून एकमेकांचे पक्ष लक्ष केले जात आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्ते पळवापळवी केली जातेय. यामुळे येथील राजकीय संघर्षात तणाव वाढल्याचे दिसून आले आहे.
नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब फोडला होता. ज्यात त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींवर आरोप केले होते. त्यापाठोपाठ शेकापने देखील थेट मंत्री भरत गोगावलेंच्या विरोधात दंड थोपाटत कॅश बॉम्ब फोडला होता. यानंतर कॅश बॉम्बचे खापर शिंदेंच्या शिवसेनेनं तटकरे यांच्यावर फोडले होते.
यामुळे देखील येथील राजकीय संघर्ष वाढला होता. आता दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक ताणले जाऊ नयेत, याची काळजी घ्यावी, अशी सूचनाच गोगावले आणि सामंत यांच्याशी चर्चा करताना बैठकीत अजित पवार यांनी केलीय. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याशीही संवाद साधला. त्यांनाही दोन्ही पक्षात वाद वाढायला नको, खबरदारी घ्या, अशा सूचना देण्यात आल्याचेही समोर आले आहे.
अजितदादांच्या या भूमिकेवर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अजितदादांनी अशी भावना व्यक्त केली असेल, तर ते स्वागत करणारी आहे. पण आधी त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही समजावून सांगावे. एखाद्याची जाणीवपूर्वक बदनामी करणे योग्य नाही. अशा प्रकारे व्हिडिओ दाखवून बदनामी केली जाते.
दादा एक पाऊल पुढे आले, तर आम्ही दोन पावले पुढे यायला तयार आहोत. मात्र पुढे जर दगा-फटका झाला, तर ‘तब का तब देखेंगे’. आम्हालाही वाद वाढवायची हौस नाही. आरोप-प्रत्यारोप राजकारणाचा भाग आहे, पण तथ्य नसताना बदनामी केली जात असेल, तर त्याचा शोध वरिष्ठांनी घ्यायला हवा,” अशी मागणी देखील गोगावले यांनी यावेळी केली आहे. त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्षापर्यंत आला आहे. तो थांबवण्यासाठीच अजित पवार यांनी हस्तक्षेप करत पुढाकार घेतला आहे. महायुतीतील अंतर्गत वाद वाढू नयेत, यासाठी राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनीही खबरदारी घ्यावी असे संकेत त्यांनी दिले आहेत. पण आता अजितदादांच्या मध्यस्थीनंतर येथील शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वाद शमणार का? हे पाहवे लागणार आहे.
1. अजित पवारांनी रायगडमध्ये हस्तक्षेप का केला?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील वाढता राजकीय तणाव रोखण्यासाठी.
2. कोणकोणाशी अजित पवारांनी चर्चा केली?
भरत गोगावले, उदय सामंत आणि आदिती तटकरे यांच्याशी चर्चा केली.
3. रायगडमधील वाद नेमका कशामुळे वाढला?
स्थानिक राजकीय वर्चस्व आणि पक्षांतर्गत समन्वयाच्या अभावामुळे.
4. या बैठकीत काय संदेश देण्यात आला?
वाद वाढू नये, संयम ठेवावा आणि सरकारची प्रतिमा जपावी.
5. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद आता थांबेल का?
अजित पवारांच्या हस्तक्षेपामुळे तणाव कमी होण्याची शक्यता आहे, मात्र पुढील घडामोडींवर सर्व अवलंबून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.