

अलिबाग विधानसभा मतदारसंघात २०२९ ची निवडणूक भाजप स्वबळावर लढवेल, अशी घोषणा अॅड. आस्वाद पाटील यांनी केली.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत भाजपला ४५ हजारांहून अधिक मते मिळाल्याचा दावा करण्यात आला.
रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप सदस्यसंख्या ३ वरून १५ वर पोहोचल्याचा दावा करत अध्यक्षपदाबाबतही आशावाद व्यक्त करण्यात आला.
Raigad News : रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद आणखी भडकण्याची शक्यता असून याला कारण आता भाजप ठरले आहे. येथे सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या पेचात महायुती अडकली असतानाच किंगमेकर ठरलेल्या भाजपने मास्टरस्ट्रोक मारत राष्ट्रवादीशी युती केल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे रायगड जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादीची युती येणार हे नक्की झाले आहे. तर १५ जागा जिंकणाऱ्या भाजपकडे अध्यक्षपद जाणार असून उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादीला समाधानी राहावे लागणार आहे. तर सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला आता सत्ते बाहेर विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. यावरून राज्यभर चर्चा रंगली असतानाच आता भाजपने शिंदेंच्या आमदाराच्या मतदार संघावर थेट दावा सांगत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिवसेनेला बाहेर ठेवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खेळली. त्यांनी मंत्री भरत गोगावले यांनी भाजपकडे हात पुढे करताच आपली आणि भाजपची निवडणुकीआधीच युती झाली होती. त्यामुळे आमचीच येथे युती होईल आणि सत्ता येईल असा दावा केला होता.
तर या दाव्याला दुजोरा देणारी घोषणा भाजप खासदार धैर्यशील पाटील यांनी केली होती. त्या पाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तटकरेंची भेट घेत युतीबाबत चर्चा केल्यानंतर रायगडमध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर शिक्कामोर्तब झाला होता. फक्त घोषणा बाकी होती. जी आज (ता.२५) भाजपने केलीय. या घोषणेनंतर आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे भाजपला आणि उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादीला जाईल असे सुत्र समोर येत आहे.
या सर्व घडामोडीनंतर आता शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागणार हे नक्की झाले असून जिल्ह्यात कमालीची शिवसेनेत नाराजी आहे. याचदरम्यान भाजपचे नेते अॅड. आस्वाद पाटील यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघात २०२९ ची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवेल, अशी घोषणा केलीय. त्यांच्या याच घोषणेमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून अद्याप यावर शिवसेना किंवा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.
वरसोली येथील होरायझन सभागृहात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमा वेळी पाटील म्हणाले की, विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत आम्ही शिवसेना आणि आमदार महेंद्र दळवी यांना मदत केली. त्यामुळे आता ते आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा होती. मात्र आम्हाला मदत झाली नाही. असो पण आता युती न झाल्याचा फायदा आम्हाला झाला असून आमची ताकद आम्हाला कळली आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट आणि गणात भाजपला ४५ हजारांहून अधिक मते मिळाली आहेत. जी आमची आहेत, पूर्वी आम्ही सहाव्या क्रमांकावर होतो. पण आता आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत.
कधीकाळी आमच्या सदस्यांची संख्या फक्त ३ होती. पण आता १५ झाली आहे. ती आम्ही भविष्यात ३५ पर्यंत नेवू असाही विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष होईल असेही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी आग्राव येथील गोरख डोयले व जयंत बागवाले यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला गेला असून येथे महेंद्र दळवी आमदार आहेत. अलिबाग-मुरुड शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असता सलग दुसऱ्यांदा दळवी येथून आमदार झाले. त्यांनी २०२४ मध्ये महाविकास आघाडीच्या चित्रालेख पाटील यांचा पराभव केला.
तर २०१९ मध्ये दळवी यांनी सुभाष पाटील यांचा 32924 मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्यांच्या याच विजयाने येथे शेकापच्या बालेकिल्ल्यास मोठे भगदाड पाडण्यास सुरूवात झाली होती. मात्र याच सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवींचा पराभव २०१४ मध्ये केला होता. ज्याचा बदला दळवी यांनी २०१९ मध्ये घेतला होता.
1. अलिबाग विधानसभा २०२९ बद्दल काय घोषणा करण्यात आली?
भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
2. भाजपने किती मतांचा दावा केला आहे?
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत ४५ हजारांहून अधिक मते मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
3. रायगड जिल्हा परिषदेत भाजपची स्थिती काय आहे?
सदस्यसंख्या ३ वरून १५ वर गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
4. अध्यक्षपदाबाबत काय भूमिका आहे?
अध्यक्ष भाजपचाच होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
5. युतीबाबत काय संकेत दिले आहेत?
युती न झाल्याने भाजपला स्वतःची ताकद समजल्याचे सांगण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.