SIT Inquiry : ५०० कोटींच्या कथित व्यवहाराचे गूढ वाढले; जरांगेंनी कदमांच्या चौकशीची मागणी केली, कदम म्हणाले, ‘खूप मसाला आहे!’

Ramdas Kadam On Manoj Jarange Patil Audio Clip SIT Inquiry : मनोज जरांगेंच्या विधानानंतर 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाला नवे वळण मिळाले असून एसआयटीकडून क्लिपचा मूळ सोर्स शोधला जात आहे.
500 Crore Audio Clip Controversy SIT investigation Manoj Jarange Patil
500 Crore Audio Clip Controversy SIT investigation Manoj Jarange PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या ऑडिओ प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाशी संबंधित पुरावे ताब्यात घेतले आहेत. या भेटीनंतर जरांगे यांनी आपल्याला आणि रामदास कदम यांना ऑडिओ क्लिप देणारी व्यक्ती एकच असण्याची दाट शक्यता असल्याचा दावा केला. तसेच या प्रकरणात रामदास कदम यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे.

जरांगे पाटील यांच्या विधानावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी सुरू असून, त्यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, असे कदम म्हणाले.

‘जरांगे पाटील, तुम्ही माझ्याकडे कशाला बोट दाखवत आहात? तुमची पत्रकार परिषद होण्याच्या एक तास आधीच ती ऑडिओ क्लिप वाजली होती. तुमच्या बीडमध्येच ती क्लिप वाजवण्यात आली होती. माझ्याकडे ती वाजवण्यात आलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी ती क्लिप मला मिळाली. आधी या गोष्टीची माहिती घ्या. आता याबाबत एसआयटी चौकशी करेल,’ असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले.

500 Crore Audio Clip Controversy SIT investigation Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : माझ्या नादी लागू नका, आपल्या हाती नवे पुरावे; दीड महिन्यात नावासह समोर आणतो म्हणत, जरांगे पाटील नवा धमाका करण्याच्या तयारीत

ती ऑडिओ क्लिप कोणी वाजवली आणि त्याचा जरांगे पाटील यांच्याशी काय संबंध आहे, हेही लवकरच समोर येईल. एसआयटीच्या चौकशीतून याचा उलगडा होईल. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावाही कदम यांनी केला. दुसऱ्या दिवशी क्लिप आपल्याकडे आल्यानंतर आपण ती वाजवली आणि तिची वेळ सांगितली, असेही त्यांनी नमूद केले.

‘जरांगे पाटील, तुम्ही इतके घाबरला आहात की थेट माझ्याकडेच बोट दाखवत आहात. आधी अभ्यास करा, माहिती घ्या आणि मग समोरच्या व्यक्तीचे नाव घ्या,’ असा सल्लाही रामदास कदम यांनी दिला. जरांगे पाटील यांनी आपल्या आजूबाजूला कोण आहेत, त्यांना ऑडिओ क्लिप कोणी दिली आणि पत्रकार परिषद होण्यापूर्वी बीडमध्ये ती क्लिप कोणी वाजवली, याचा शोध घ्यावा, असे आवाहन कदम यांनी केले. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून, ते एसआयटीच्या चौकशीत स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी कदम यांनी जरांगे पाटील यांना माहिती घेऊन बोलण्याचा सल्ला देत, ‘खोटं बोलं, पण रेटून बोलं, असं होता कामा नये,’ असे विधान केले. या विषयावर आपल्याला अधिक बोलायचे नव्हते; मात्र आता बोलण्यासारखे खूप काही आहे आणि ‘खूप मसाला आहे’, असे सूचक विधानही त्यांनी केले. पण सध्या या विषयावर आणखी काही बोलायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

500 Crore Audio Clip Controversy SIT investigation Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार, सात डिसेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात जाणार!

नेमकं काय म्हणाले होते जरांगे पाटील?

ऑडिओ क्लिपच्या स्रोताबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांचे नाव घेतले होते. ‘माझ्या अगोदर रामदास कदम यांनी ती क्लिप वाजवली होती. मला क्लिप देणारा माणूस आणि त्यांना क्लिप देणारा माणूस एकच असण्याची दाट शक्यता आहे. मग त्यांची चौकशी का होऊ नये? त्यांना क्लिप कोणी दिली?’ असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला होता. जरांगे यांच्या या मागणीनंतर आता एसआयटी रामदास कदम यांचीही चौकशी करणार का, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.