BJP News : भाजपच्या माजी नगरसेवकाची प्लंबरला रॉडने मारहाण? गुन्हा दाखल; पैशांच्या वादातून कार्यालयातच राडा

BJP Former Corporator Abhimanyu Gaikwad Assault Controversy : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे डॉक्टर मारहाण प्रकरणात अडचणीत आले असतानाच आता भाजपच्या माजी नगरसेवकही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kalyan News : कल्याण-डोंबिवली परिसरातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना आता कल्याण पूर्वेतून आणखी एका वादाची घटना समोर आली आहे. इमारतीतील प्लंबिंगच्या कामाचे थकीत पैसे मागण्यासाठी गेलेल्या प्लंबरला भाजपचे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड आणि त्यांच्या मुलांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

भगवान म्हात्रे असे जखमी प्लंबरचे नाव असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, गायकवाड यांनी हे आरोप फेटाळून लावत उलट म्हात्रे यांनीच कार्यालयात येऊन शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

थकीत ५० हजार रुपयांवरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, भगवान म्हात्रे यांनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी अभिमन्यू गायकवाड यांच्याशी संबंधित इमारतीत प्लंबिंगचे काम केले होते. या कामाचे जवळपास ५० हजार रुपये अद्याप मिळाले नसल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून या रकमेची मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा थकीत रकमेची मागणी केली. यासाठी म्हात्रे हे अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, पैशांच्या मागणीवरून वाद निर्माण झाला. गायकवाड आणि त्यांच्या मुलांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप भगवान म्हात्रे यांनी केला आहे. या हल्ल्यात आपण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

BJP
BJP Corporator Resigns : भाजप नेत्याचा सभापतीपदाचा राजीनामा; शिंदेंच्या शिवसेनेनं बांदेकरांची विकेट काढली

प्लंबरवर अतिदक्षता विभागात उपचार

मारहाणीत जखमी झालेल्या भगवान म्हात्रे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, थकीत पैशांच्या वादाचे रूपांतर मारहाणीत कसे झाले, याची चर्चा सुरू आहे.

अभिमन्यू गायकवाड यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, अभिमन्यू गायकवाड यांनी भगवान म्हात्रे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. म्हात्रे यांचे पैसे आपले चुलत भाऊ संदीप गायकवाड यांच्याकडे थकीत असल्याचा दावा त्यांनी केला. पैसे मागण्यासाठी कार्यालयात आलेल्या म्हात्रे यांनीच शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच म्हात्रे यांच्या अंगावरील जखमा जुन्या असल्याचाही दावा त्यांनी केला. या वादात दोन्ही बाजूंचे मिळून दोघे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे नेमका वाद कसा झाला आणि मारहाण कोणी सुरू केली, हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे.

कोळसेवाडी पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जखमींचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे घटनेची सत्यता तपासली जाणार आहे.

BJP
BJP Corporator Shibir : माध्यमांशी बोलू नका अन् कमर्शिअल नगरसेवक बनू नका : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी शिबिरात भाजप नगरसेवकांना सल्ला

दरम्यान, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे परिसरात अलीकडच्या काळात घडलेल्या राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवर या घटनेचीही चर्चा सुरू झाली आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणानंतर तसेच ठाण्यातील मानपाडा येथे ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता कल्याण पूर्वेतील या मारहाणीच्या आरोपामुळे नव्या वादाची भर पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.