

आंबा व काजू बागायतदारांसाठी सरकारने हेक्टरी 22 हजार आणि विमाधारकांना 42 हजार मदत जाहीर केली.
दोन आंदोलनांनंतर सरकारने हा निर्णय घेतला.
राजू शेट्टी यांनी या घोषणेवर टीका करत नितेश राणेंवरही निशाणा साधला.
Kolhapur/Sindhudurg News : कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी एकदा नाही दोनदा आंदोलन केल्यानंतर आता राज्य सरकारला जाग आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा देणारी घोषणा केली. फडणवीस यांनी बुधवारी (ता.२५) विधानसभेत कोकणातील आंबा, काजू बागायतदारांना हेक्टरी २२ हजार रुपये मदत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर ही मदत ज्या फळपीक उत्पादकांनी विमा काढलेला नाही, त्यांच्यासाठी असून ज्यांनी विमा काढलेला आहे त्यांना हेक्टरी ४२ हजार रूपये मिळणार आहे. पण आता याच घोषणेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. तसेच त्यांनी यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरही जोरदार निशाना साधत बोचरी टीका केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी, हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे ज्या फळपीक उत्पादकांनी विमा काढला नाही, त्यांना मदत केली जाईल. जी हेक्टरी २२ हजार रुपये असेल. तर विमा संरक्षित केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार रुपये मिळतील. तत्पूर्वी नुकसानीचे पंचनामे कृषी विभागातर्फे केले जाणार आहेत.
नुकसानीचा अंतिम अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार असून, मागील वेळेपेक्षा वाढ करून यंदा सुमारे २२ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याचा शासनाचा मानस असल्याची घोषणा फडणवीस यांनी विधानसभेत केली. तसेच आंबा आणि काजूसह धान उत्पादकांनाही बोनस देण्यात येईल. त्यासंबंधीची कार्यपद्धती निश्चित करण्यात येत असल्याचे सांगितले.
दरम्यान आता या घोषणेनंतर कोकणातील शेतकऱ्यांची धुसफूस सुरू झाली असून राजू शेट्टी यांनी देखील यावरून टीका केली आहे. दोनदा आंदोलन करत कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आंबा बागायतदारांसाठी हेक्टरी ५ लाख तर काजूला हेक्टरी ३ लाख नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील शेतकऱ्यांची मागणी सरकारपर्यंत पोहचवू तसेच किमान १ लाखांपर्यंत प्रति हेक्टर मदत देण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
मात्र १ लाखांपर्यंत प्रति हेक्टर मदत सोडाच ती धड मागणीचा चौथा हिस्सा देखील नसल्याने आता शेतकरी संतापले आहेत. यावरूनच राजू शेट्टी यांनी, राज्यातील आंबा उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाला असताना, राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत म्हणजे 'उंटाच्या तोंडात जिरे' अशीच असल्याची टीका केली आहे. तसेच त्यांनी ही तुटपुंजी मदत जाहीर करून सरकारने आंबा बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळले असून, त्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली आहे.
एका हेक्टरवर आंबा बागेची मशागत, औषध फवारणी आणि खतांसाठी शेतकऱ्याला वर्षाकाठी किमान ४ ते ४.५० लाख रुपये प्रत्यक्षात खर्च येतो, अशा परिस्थितीत केवळ २२ हजार रुपये देऊन सरकार शेतकऱ्यांचे काय साध्य करू इच्छिते? असाही सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोकणातील हापूस आणि राज्यातील केसर आंबा उत्पादक जागतिक स्तरावर राज्याचे नाव उंचावत आहेत. मात्र, संकटकाळी त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप हे सरकार करत आहे. ही मदत म्हणजे मदतीच्या नावाखाली केलेली क्रूर थट्टा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एकीकडे गरजेचा नसलेला शक्तीपीठ महामार्ग करण्यास दरिद्री फडणवीस सरकारकडे १ लाख १५ हजार कोटी आहेत. मागील कुंभमेळा २५०० हजार कोटी रूपये खर्चून करण्यात आला. यंदा २५ हजार कोटी खर्च करत आहेत. तर फडणवीस ही उधळपट्टी फक्त टक्केवारीसाठी करत आहेत, असा आरोपही शेट्टी यांनी केला असून राज्यात १ लाख २४ हजार हेक्टर आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख रूपये प्रमाणे मदत करण्यासाठी ६ हजार कोटी रूपये सरकारकडे नाहीत ही कृषीप्रधान राज्याची शोकांतिका असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.
कोकणातील शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर उतरला असून ही मदत म्हणजे त्यांच्या संघर्षावर मीठ चोळल्यातील प्रकार झाल्याने लवकरच मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढणार असून येत्या दोन दिवसात या मोर्चाची तारीख जाहीर करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
नितेश राणेंनाही झापलं
यावेळी राजू शेट्टी यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर निशाना साधत जोरदार टीका केली. नितेश राणे मोठ्या तोंडाने सांगत होते की सरकार शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊ देणार नाही. आम्हाला शेतकऱ्यांची काळजी आहे. पण आता घोषणा झाल्यानंतर हीच का शेतकऱ्यांची काळजी? असा प्रश्न शेट्टी यांनी विचारला आहे. तसेच नितेश राणेंना झापताना तुम्ही एकदा 'तुमच्या वडिलांची कारकीर्द आठवा, ते विरोधी पक्षनेते असताना वाघासारखे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडत होते', अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी राणेंवर जोरदार प्रहार केला आहे.
1. आंबा-काजू बागायतदारांना किती मदत जाहीर झाली आहे?
➡️ विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 22 हजार आणि विमाधारकांना 42 हजार रुपये मिळणार आहेत.
2. हा निर्णय का घेण्यात आला?
➡️ शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने हा दिलासादायक निर्णय घेतला.
3. या निर्णयावर कोणाची टीका झाली आहे?
➡️ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या घोषणेवर टीका केली आहे.
4. नितेश राणेंचा या प्रकरणात उल्लेख का झाला?
➡️ राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान शेट्टी यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला.
5. ही मदत कधी मिळणार?
➡️ सरकारच्या प्रक्रियेनुसार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.