

BJP MLA Mahesh Baldi News : रायगड जिल्ह्यातील उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांना अलिबाग न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 16 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाने बालदी यांच्यासह अन्य तीन जणांना दोषी ठरवले आहे. या निकालामुळे महेश बालदी यांच्या विधानसभा सदस्यत्वाबाबत प्रश्न निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बालदी यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
हे प्रकरण 2010 मधील उरण परिसरातील एका घटनेशी संबंधित आहे. एका मुलीची छेडछाड झाल्याच्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी महेश बालदी आणि त्यांचे काही सहकारी संबंधित तरुणाकडे गेले होते. त्यावेळी झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आल्याचा आरोप होता.
तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा खटला अलिबाग न्यायालयात सुरू होता. तब्बल 16 वर्षांनंतर न्यायालयाने महेश बालदी यांच्यासह चार जणांना दोषी ठरवत तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
मात्र, शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. तसेच निकालाविरोधात जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिल्याची माहिती समोर आली आहे. या निकालानंतर आता त्यांच्या आमदारकीबाबत कायदेशीर आणि राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
अशातच रोहिणी खडसे यांनी महेश बालदी यांच्या आमदारकीवर प्रश्न उपस्थित करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेची मागणी केली आहे. रोहिणी खडसे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून महेश बालदी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच शिक्षा झाल्यानंतरही संबंधित आमदार सभागृहाचे सदस्य कसे राहू शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर विधानसभेची प्रतिष्ठा आणि सभागृहाची प्रतिमा जपण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर या प्रकरणात योग्य निर्णय घ्यावा, अशी भूमिका रोहिणी खडसे यांनी मांडली.
दरम्यान आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. तर यावर निर्णय न घेतल्यास या मुद्द्यावर अधिवेशनातही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर या मुद्द्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.