

Jitendra Awhad threat : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांना, मिळत असलेल्या धमक्यांवरून, एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. मंत्री सरनाईक ही टिप्पणी करत असताना, माजी खासदार आनंद परांजपे देखील शेजारी उभे होते.
मंत्री सरनाईक यांनी, हसत-हसत शेजारी उभे असलेल्या आनंद परांजपे यांच्याकडे पाहून, माझ्यापेक्षा याबाबत थोडं जास्तीच यांनाच माहिती असेल, अशी टिप्पणी केली. यावर परांजपे यांनी सरनाईक यांच्या या टिप्पणी हसून प्रतिसाद दिला. सरनाईक यांची मिश्किल टिप्पणी आणि दोघांचे माध्यमांसमोरील हसू, जितेंद्र आव्हाड यांना आलेल्या धमकीची खिल्ली उडवणारे होते. तरी देखील पोलिसांनी याबाबत खबरदारी घ्यावी, असेही मंत्री सरनाईक पुढे म्हणाले.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांना सारख्या-सारख्या धमक्या का येत आहेत, याचे निरीक्षण आव्हाड यांनीच केले पाहिजे. जितेंद्र आव्हाड आणि माझी राजकीय करिअरला एकाच वेळी सुरूवात झाली. 2009, 2014, 2019, 2024 मध्ये आम्ही एकत्रित आमदार झालो. मला अद्याप धमकी येत नाही. राज्याचा मंत्री आहे. चार वेळा आमदार झालो आहे."
मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) पुढे बोलताना, आव्हाडांना येणाऱ्या धमक्यांबाबत आनंद परांजपे यांना थोडं जास्तच माहिती असेल, असे हसत-हसत टोला लगावला. जितेंद्र आव्हाड यांना पहिल्यांदा जेव्हा धमकी आली होते, तेव्हाचा मी साक्षीदार आहे, असेही सांगितले.
आव्हाडांनी ज्या पक्षातून राजकीय पदार्पण केले आहे, तेव्हापासून त्यांच्याभोवती धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. ते आता पुढे-पुढे चालले आहे. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे सांगताना खरोखरच त्यांना धमकी आले असेल, तर पोलिसांनी ताबडतोब त्यांच्या संरक्षणात वाढ केली पाहिजे, असेही मंत्री सरनाईक यांनी म्हटले.
जितेंद्र आव्हाड यांना वाय सुरक्षा व्यवस्था असेल, तर त्यांना झेड सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी पुरवावी. ठाण्याची जनता त्यांना विसरू शकत नाही. ठाणे अन् राज्यासाठी त्यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे, असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
एका अज्ञात व्यक्तीने जितेंद्र आव्हाड यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. फोन करणारा व्यक्ती घराच्या दरवाजाजवळ उभा असल्याचा दावा केला होता. आव्हाड यांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी संबंधित क्रमांकावर फोन केला असता, त्यांनाही "आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला पण गोळ्या घालेन" अशी धमकी दिली, असे म्हटले जाते. प्राथमिक तपासात फोन करणारा नंबर पुण्याचा असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक आणि ठाणे पोलिसांचे याबाबत लक्ष वेधले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.