

Sindhudurg Crime News : पालकमंत्री नीतेश राणे यांनी हाती घेतलेल्या ‘नशामुक्त सिंधुदुर्ग...’ अभियानातंर्गत पोलिसांनी छापेमारी करत धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. वेंगुर्ले येथील शिरोडा येथे छापा टाकत शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश ऊर्फ भाई परब यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या घरातून ५०४ ग्रॅम गांजा आणि २.२६ ग्रॅम मेथामफेटामाईन पावडर जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी परब याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
दरम्यान आता या कारवाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी परब यांच्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने आणि अन्यायकारक असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाने केला आहे. तसेच मायनिंग हस्तकांच्या इशाऱ्यावर ही कारवाई केल्याचा आरोप देखील मराठा महासंघाने केला आहे.
पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी ‘नशामुक्त सिंधुदुर्ग’ अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थांची विक्री, साठवणूक व तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध अमली पदार्थांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर शिरोडा येथे झालेल्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
शिरोडा येथे परब यांच्या घरात अमली पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली होती. याची खातरजमा करून पोलिस पथकाने सकाळी आठच्या सुमारास परब यांच्या घरावर छापा टाकला. घराची झाडाझडती घेत असताना टेबलाखाली ठेवलेल्या एका बॅगेत १५ हजार रुपये किमतीचा ५०४ ग्रॅम गांजासदृश पदार्थ तसेच ३३ हजार रुपये किमतीची २.२६ ग्रॅम वजनाची पांढरी मेथामफेटामाईन सदृश्य पावडर आढळून आली. पोलिसांनी दोन्ही पदार्थ जप्त केले. सुमारे ४७ हजार रुपये मुद्देमालाची किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईदरम्यान पदार्थांची तपासणी व नमुने घेण्यासाठी ओरोस येथील न्यायवैद्यक पथकाला शिरोडा येथे पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी परब यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. हा अमली पदार्थांचा साठा घरात कशासाठी ठेवण्यात आला होता, त्याचा पुरवठा कोणी केला, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या प्रकरणाचे कोणते मोठे रॅकेट आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वेंगुर्ले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या नेतृत्वाखालील पथकात स्वप्निल तांबे, मंगेश कदम, दीपा मठकर, जयेश सरमळकर, मनोज परुळेकर, प्रथमेश पालकर, घाडगे, गुरव, योगेश मांजरेकर यांचा समावेश होता. निरीक्षक ओतारी तपास करत आहेत.
सिद्धेश यांनी वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती पद भूषविले होते. त्यांनी २०२५ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमधून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. हल्लीच त्यांना शिवसेना जिल्हा उपप्रमुख पद देण्यात आले होते. त्यांची पत्नी योगिता परब या वेंगुर्ले पंचायत समितीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती व मराठा कार्यकर्ते सिद्धेश परब यांच्यावर गांजा प्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई सूडबुद्धीने आणि अन्यायकारक असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी केला आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, परब हे १० वर्षांपासून मराठा चळवळीशी जोडलेले आहेत.
त्यांनी सामाजिक जाणिवेतून सुरू केलेल्या मायनिंग विरोधी लढ्यामुळेच हा प्रकार काहींनी घडवून आणला आहे. मायनिंग हस्तकांच्या इशाऱ्यावर ही कारवाई केल्याचा आरोप करत, मराठा महासंघाने या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या कठीण प्रसंगात समाज बांधवांनी परब आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. सावंत यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.