

Palghar Crime News : पालघर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. फेसबुकवरील एका वादग्रस्त कमेंटवरून एका तरूणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणात वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महिला नगरसेविकेसह त्यांच्या समर्थकांवर तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नगरसेविकेसह इतर संशयित फरार आहेत.
काहीच दिवसांपूर्वी पालघरच्या रिलीफ रुग्णालयात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याच्यासह जिल्हाध्यक्षाने उपचार आणि बिलावरून मोठा राडा केला होता. डॉक्टरांना शिवीगाळ, अर्वाच्य भाषा वापरत रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.
या प्रकरणात आमदारपुत्र रोहित राजेंद्र गावित याला अटक झाली असून न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. तर या प्रकरणात तब्बल २३ जणांना अटक झाली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच पालघरमध्ये पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नगरसेविका आणि समर्थकांनी एका तरूणाला जबर मारहाण केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नालासोपारा परिसरातील विश्वकर्मा नावाच्या एका तरुणाने फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. याच पोस्टवरून वादाची ठिणगी पडली असून ती शिंदेच्या शिवसेना नगरसेविका हेमलता सिंग आणि त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांना आवडली नाही.
ज्यानंतर नगरसेविकेच्या काही समर्थकांनी विश्वकर्माला त्याच्या घरातून जबरदस्तीने उचलत कार्यालयात आणले. आणि त्याला बेदम मारहाण केली. यानंतर विश्वकर्मा यांनी महिला नगरसेविकेसह त्यांच्या समर्थकांविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. याच तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विश्वकर्मा यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते नालासोपारा येथील एका हॉटेलमध्ये अर्जुन दुबे नावाच्या एका व्यक्ती भेटण्यासाठी गेले होते. याचवेळी तेथे स्थानिक नगरसेविका हेमलता सिंग आणि त्यांचे सहकारी अमरीश उपस्थित होते. त्यांनी विश्वकर्मा यांना पाहताच धक्काबुक्की करत कानशिलात लगावलीय तसेच बांबूच्या काठ्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेत २० हजार रुपये किंमतीचा स्मार्टफोन देखील काढून घेतला, असा आरोप देखील विश्वकर्मा यांनी केला आहे.
या घटनेनंतर दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महिला नगरसेविकेसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल दाखल केला आहे. तर अधिक तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील ती पोस्ट तपासली जात आहे.
दरम्यान या प्रकरणात तक्रारदाराविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांनी तक्रारदार विश्वकर्मा यांच्यासह आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. तर नगरसेविका हेमलता सिंह तसेच इतर अनेक संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.