Relief Hospital Case : पालघर मारहाण प्रकरणात शिंदेंनी हकालपट्टी केलेल्या नेत्याला दिलासा नाहीच; जामीन अर्ज फेटाळला, नीलम संखे यांचा निर्णय १ डिसेंबरला

Kundan Sankhe Bail Rejected in Palghar : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून शिंदेंच्या शिवसेनेतून हाकालपट्टी केलेले जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा नियमित जामीन अर्ज पालघर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
Palghar Relief Hospital Case
Palghar Relief Hospital CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Palghar News : पालघरच्या रिलीफ रुग्णालयात झालेल्या गोंधळ आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने नकारात्मक भूमिका घेतली आहे. पालघर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सागर नारायणराव पाटील यांनी हा निर्णय दिला. आरोपीला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता न्यायालयाने व्यक्त केली. यासोबतच तपास यंत्रणेच्या कामकाजाबाबतही न्यायालयाने काही कठोर निरीक्षणे नोंदवली आहेत.

कुंदन संखे यांच्याविरोधात यापूर्वी सात गुन्हे दाखल असल्याची माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली. त्यातील सहा प्रकरणांत त्यांची निर्दोष मुक्तता झाली असून, एक खटला अद्याप न्यायप्रविष्ट आहे. राजकीय पद आणि प्रभावाचा वापर करून फिर्यादी किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याची अथवा पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. या बाबींचा विचार करून संखे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका नीलम संखे यांनीही जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर १ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. कुंदन संखे यांचा जामीन नाकारण्यात आल्यानंतर नीलम संखे यांच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याची उत्सुकता आहे.

Palghar Relief Hospital Case
Palghar Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा: सहा जामीन अर्ज फेटाळले; 23 आरोपी कोठडीतच

दहीहंडी उत्सवाच्या काळात गोविंदा पथकातील एका जखमी सदस्याच्या उपचारावरून ५ सप्टेंबर रोजी पालघरच्या रिलीफ रुग्णालयात वाद निर्माण झाला होता. या वादादरम्यान शिवसेनेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याचा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता.

रुग्णालयातील कर्मचारी विवेक झिंगा यांना मारहाण झाल्याची तक्रार पालघर पोलिसांकडे दाखल करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एकूण २३ जणांना अटक केली असून, त्यापैकी ११ गोविंदा आणि एका कॅमेरामनला जामीन मिळाला आहे.

या प्रकरणात शिवसेनेचे निलंबित जिल्हाप्रमुख कुंदन संखे, त्यांचा वाहनचालक, शहरप्रमुख राहुल घरत, युवासेना प्रमुख साईराज पाटील, आमदारपुत्र रोहित गावीत, ऋषभ वारे, राहुल संखे, शुभम बांदिवडेकर, नगरसेविका नीलम संखे आणि सदस्य मनोज घरत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. सप्टेंबरपासून आरोपींकडून जामिनासाठी विविध अर्ज दाखल करण्यात आले; मात्र अद्याप काही आरोपींना दिलासा मिळालेला नाही. सोमवारी कुंदन संखे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने तो फेटाळला.

जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने वैद्यकीय उपचारांची जबाबदारी सरकारी यंत्रणेवर असल्याचे स्पष्ट केले. केवळ आजारपणाच्या कारणावरून जामीन मंजूर करता येणार नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याची बाब तक्रारदाराकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. या मुद्द्याची योग्य पद्धतीने मांडणी न झाल्याबद्दल न्यायालयाने तपास यंत्रणेच्या भूमिकेवर निरीक्षणे नोंदवली.

Palghar Relief Hospital Case
Palghar Hospital Case : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिंदेंच्या आमदारपुत्राला दणका! डॉक्टर मारहाणप्रकरणात सहा जणांचे जामीन रद्द

आरोपीला जामिनावर सोडल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची किंवा पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले. जामीन अर्ज फेटाळताना सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयातील संबंधित प्रकरणांमध्ये नोंदवलेल्या न्यायालयीन निरीक्षणांचाही आधार घेण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.