
Raigad News : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला आहे. पालकमंत्रिपदावर आदिती तटकरे यांची निवड झाली होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांच्याकडून तीव्र विरोध झाल्यानंतर ही नियुक्ती रद्द करण्यात आली होती. यानंतर अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. दरम्यान आज (ता. 12) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्ताने किल्ले रायगड येथे अभिवादनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. याच कार्यक्रात हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान हा प्रश्न कोणाच्या अखत्यारितला येतो. तो कोण सोडवू शकतो यावर भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी भाष्य केलं आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गटात अस्वस्थता आहे. तर हे पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरात देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. यामुळे मंत्री भरत गोगावलेंसह शिवसेनेचे आमदार आक्रमक आहेत. तर हे पालकमंत्रिपद गोगावले यांनाच मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडच्या दौऱ्यावर असून डिनर डिप्लोमसीद्वारे रायगडच्या पालकमंत्रीपदावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावरून देखील गोगावले यांनी भाजपला आव्हान दिले आहे. तर पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली नाही तर येत्या काळात मोठा गोंधळ होईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या इशाऱ्याची सध्या राज्यात चर्चा सुरू असतानाच आता शेलार यांनी नवा मुद्दा उपस्थित केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
आशिष शेलार यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत वक्तव्य करताना, हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय फडणवीस घेतील असे म्हटले आहे.
दरम्यान रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सुनील तटकरे वजन तगडे मानले जात असतानाच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच वजन देखील वाढलं आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे एकट्या आमदार आहेत. तर शिवसेनेचे रायगडमधून भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी असे तीन आमदार आहेत. यामुळे ज्याचे आमदार जास्त त्याच्याकडे पालकमंत्रीपद असे सुत्र ठरले होते.
मात्र रायगडमध्ये झाले उलटेच. यामुळे शिवसेनेच्या आमदारांचा तटकरे कुटुंबाकडे पालकमंत्रीपद देण्यास कडाडून विरोध आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी गोगावले यांनी आधीपासूनच दंड थोपाटले होते. पण पालकमंत्रीपद तटकरेंना देण्यात आल्याने वाद उफाळला होता. यानंतर रद्द केलेल्या पालकमंत्री पदावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.