

Ratnagiri News : परदेशी जहाजाला पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्र आणि आवश्यक चाचण्यांसाठी परवानगी देण्याच्या मोबदल्यात ८० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या रत्नागिरीतील प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यासह त्याच्या एका साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लाचेचा ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना साथीदाराला रंगेहाथ पकडण्यात आले, तर मुख्य संशयित प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ यालाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे बंदर विभागात खळबळ उडाली आहे.
परदेशी जहाजाच्या परवानगीसाठी मागितली ८० हजारांची लाच
तक्रारदाराची रत्नागिरी येथे शिपिंग एजन्सी आहे. त्यांच्या एजन्सीमार्फत जयगड बंदरात आलेल्या नादुपिस्त या परदेशी जहाजाची दुरुस्ती करण्यात आली होती. या जहाजाच्या चाचण्यांसाठी परवानगी आणि पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ (वय ४७) यांनी तक्रारदाराकडे ८० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १३ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.
६० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना साथीदार जाळ्यात
प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनी ८० हजार रुपयांपैकी ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता आपला साथीदार मिलिंद तुकाराम बनप (वय ५३, रा. घाणेकर आळी, रत्नागिरी) याच्याकडे देण्यास सांगितले होते.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सायंकाळी ५ वाजून २१ मिनिटांनी मिलिंद बनप याने तक्रारदाराकडून ६० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर त्याने फोन करून पैसे मिळाल्याची माहिती संदीप भुजबळ यांना दिली. याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बनप याला तत्काळ ताब्यात घेतले.
प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळलाही अटक
साथीदाराला ताब्यात घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्य संशयित प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ याच्यावरही कारवाई केली. मंगळवारी (ता. १७) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबीच्या पथकाची कारवाई
ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव आणि सुहास रोकडे यांच्यासह पथकाने सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.