

रत्नागिरी जिल्हा परिषद निकालानंतर हातखंब्यात राजकीय तणाव निर्माण झाला.
सुयोग कांबळे यांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान पराभूत उमेदवार परशुराम कदम यांच्या घरासमोर फटाके व नारळ फोडल्याने वाद वाढला.
पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र परिसरात तणाव कायम आहे.
ratnagiri political clash News : रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून हातखंब्यात पालकमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनाच आव्हान देणाऱ्या अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांचा पराभव झाला. या निकालानंतर हातखंबा येथे राजकीय संघर्षाची ठिणगी पडली असून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुयोग कांबळे यांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांचा उन्माद पाहायला मिळाला.
पराभूत परशुराम कदम यांच्या घरासमोर मिरवणूक थांबवून फटाके आणि नारळ फोडण्यात आले. यावेळी घराच्या बांधाचे नुकसान झाले. यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे सुयोग कांबळे आणि कदम यांचा गट आमनेसामने आल्याने राडा झाला. पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी परिसरात अद्याप तणावाचे वातावरण आहे.
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे सुयोग कांबळे आणि शिवसेनेतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटच्या फेरीपर्यंत रंगतदार ठरलेल्या या निवडणुकीत अखेर सुयोग कांबळे यांनी बाजी मारली. या विजयानंतर शिवसैनिकांनी मंगळवारी (ता.१०) रात्री हातखंबा परिसरात जल्लोषात मिरवणूक काढली.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणूक जेव्हा पराभूत उमेदवार परशुराम कदम यांच्या घरासमोर आली, तेव्हा शिवसैनिकांनी तिथे फटाके फोडले आणि नारळही फोडले. याच दरम्यान, मिरवणुकीतील मोटारीचा धक्का लागून कदम यांच्या घरासमोरील बांधाचे (गडगा) दगड कोसळले. यामुळे संतप्त झालेल्या परशुराम कदम यांनी मिरवणुकीवर आक्षेप घेतला आणि दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना पांगवले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वातावरण शांत झाले असले तरी या राजकीय राड्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.
जिंकलात तर त्रास कशासाठी : कदम
या घटनेनंतर परशुराम कदम यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निवडणूक झाली, तुम्ही जिंकलात, मग आता अशा पद्धतीने दुसऱ्याच्या घरासमोर येऊन त्रास देण्याचा प्रकार योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विजयाचा उन्माद करून कोणाच्या खासगी मालमत्तेचे नुकसान करणे अयोग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
1. वादाची सुरुवात कशी झाली?
विजयी मिरवणुकीदरम्यान पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके आणि नारळ फोडल्यामुळे वाद निर्माण झाला.
2. या निवडणुकीत कोणाचा पराभव झाला?
अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांचा पराभव झाला.
3. सुयोग कांबळे कोण आहेत?
ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असून त्यांनी हातखंबा मतदारसंघात विजय मिळवला.
4. पोलिसांनी काय पावले उचलली?
पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत केले आणि पुढील अनर्थ टाळला.
5. सध्या हातखंब्यातील परिस्थिती कशी आहे?
परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.