Sindhudurg News : काहीच दिवसांपूर्वी आजारपणातून बाहेर आलेले शिवसेनेचे नेते माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत देत आपण आता पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यांनी ही घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 रुग्णवाहिका लोकार्पणाचा कार्यक्रमात केला होती. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तर आता त्यांचा राजकीय वारसदार कोण? अशी चर्चा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पण निवृत्तीची घोषणा करणारे दीपक केसरकर खरच निवृत्ती घेणार का? याचीही अनेकांना खात्री नाही. कारण याआधी देखील तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरताना त्यांनी अशीच घोषणा केली होती. मात्र आता ते या मतदार संघाचे चौथ्यांदा प्रतिनिधीत्व करत आहेत. पण आता मागच्या निवडणुकीपेक्षा फरक असून आता त्यांची तब्बेत साथ देत नसल्याचेच सत्य आहे. यामुळेच त्यांनी ही घोषणा केली असावी.
दरम्यान ही घोषणा करण्याआधीच त्यांनी कदाचित आपला डाव खेळला असावा आणि आता ते पत्ते बाहेर काढत आहेत. येथील राजकारण हे वैचारिक नसून ते चेहर्यावर खेळली जाते. येथे कधीकाळी केसरकर गट 50 ते 60 हजार कार्यकर्त्यांचा होता. तो शिवसेना फुटीमुळे 35 ते 40 हजारांच्या घरात आला आहे. पण सर्वांशी आदबीनं वागणे आणि सामंजस्यपणा दाखवणे यामुळे आजही त्यांचा गट जिथल्या तिथ आहे. तसेच त्यांना त्यांचे विरोधकही मदत करतात. यामुळे तेथील आरोग्य, बेरोजगारी असे महत्वाचे प्रश्न असूनही फक्त चेहऱ्याभोवती राजकारण फिरतं. याच अनुशंगाने यंदाच्या निवडणुकीत दीपकभाईंनी गावोगावी जाऊन प्रचार केला होता. तर यावेळी त्यांनी आपली मुलगी सोनाली आणि जावई सिद्धार्थ यांना सोबत घेतले होते.
त्यांच्या प्रचारास यंदा शिवसेना नेते तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धुरळा उडवून दिला होता. तर मुलगी सोनाली आणि जावई सिद्धार्थ यांच्या योग्य संपर्क आणि महायुतीच्या ताकदीच्या जोरावर ते चौथ्यांदा विजयी झाले.
यामुळे आता त्यांची मुलगी सोनाली किंवा जावई सिद्धार्थ यांना त्यांनी प्रचारातून निवडणुकीच्या रिंगणात आणत त्यांचे ब्रँडिंग केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. तर या ब्रँडिंगमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंसह महायुतीच्या नेत्यांचा वापर करून घेतला. आता मतदारसंघात मुलगी सोनाली आणि जावई सिद्धार्थ यांचेही नाव सर्सास समोर येत आहे. तसेच या दोघांनी मतदार संघावर आपली पकडही धरली आहे.
याआधीही दीपक केसरकर यांनी आपण थांबत असल्याची घोषणा करताना आपला राजकीय वारसदार हा युवा, तरूण, तडफदार नेतृत्व असेल असे म्हटलं होते. त्यामुळे दोनवेळी आमदाराकीसाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेना नेते संजू परब यांचे नावही आता समोर येत आहे. तर त्यांनी नुकताच भाजपमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत केसरकर यांना साथ दिली होती. तर त्यांची सध्या जनमानसात चांगली इमेज तयार झाली असून तेही भविष्यात आमदारकीच्या रेसमध्ये असून शकतात. परब हे नीलेश राणे यांचे कट्टर समर्थक असून जीथे राणे तिथे परब असे समिकरण येथे आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या नावाला बळ देण्याचे काम राणे देखील करू शकतात.
सध्याच्या घडीला महायुती एकसंघ असल्याने मागच्या वेळी विद्यमान आमदारालाच जागा सुटली होती. त्यामुळे भविष्यातही अशीच महायुती राहिल्यास ही जागा केसरकर यांच्यासाठी सुटेल. पण ते यासाठी कोणता आग्रह धरतात. ते पाहावं लागणार आहे. पण जर महायुतीत फूट पडल्यास ही जागा केसरकर यांच्या हातून जाऊ शकते. कारण सध्या नीलेश राणे असो किंवा मंत्री नितेश राणे हे पक्षापेक्षा आपली राजकीय ताकद वाढवत आहे. ते यासाठी आपल्या प्रमुख नेत्यांची ताकद देखील वाढवण्यावर भर देत आहेत. सध्या संजू परब जिल्ह्यात शिवसेनेच्या केंद्रस्थानी असून यामागे नीलेश राणे यांचे राजकीय गणित असल्याचेही चर्चा आहे. त्यामुळे भविष्यात असे काही झाल्यास तेथे केसरकर यांच्याविरोधात परब अशी टक्कर होऊ शकते.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आता झालेल्या निवडणुकीत दीपक केसरकर यांनी 39 हजार 899 चे मताधिक्य घेत विजयाचा चौकार ठोकला होता. यावेळी मतदारसंघात चौरंगी लढत झाल्याने त्यांचा विजय सुकर झाला होता. केसरकर यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन तेली (41, 109 मते), भाजपचे बंडखोर विशाल परब (33, 281 मते) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) च्या बंडखोर उमेदवार अर्चना घारे-परब (6174) मैदानात होत्या. महाविकास आघाडीतच मेळ नसल्याने येथे मते विभागली गेली होती.
केसरकरांचा राजकीय प्रवास हा काँग्रेसच्या तिकीटावर सावंतवाडी पालिकेतून सुरू झाला. तो फक्त त्यांचे वडील वसंत केसरकर यांच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वमुळे. पण ते जास्त काळ काँग्रेससोबत राहिले नाहीत. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्याशी जवळीक वाढवून 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. हाच त्यांच्या राजकीय प्रवासाचा टर्निंग पॉईंट होता. त्यावेळी ते नगराध्यक्ष झाले. याचवेळी त्यांना राष्ट्रवादीकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळविली आणि ते त्यावेळी काँग्रेसमध्ये असणाऱ्या नारायण राणेंच्या मदतीने आमदार झाले. तर त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी सोडत शिवसेनेचे ‘शिवबंधन’ बांधले. मात्र याच्याआधी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची युती असतानाही लोकसभा निवडणुकीत शरद पवारांसह राणेंना अंगावर घेत शिवसेच्या विनायक राऊतांना मदत केली होती. तेथेच राणेंचा पराभव झाला. तर येथेच केसरकर-राणे वादाचा पायाही घातला गेला. यानंतर 2014 त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाणावर विधानसभा लढवली आणि ते पुन्हा आमदार झाले. ते अर्थ व वित्त विभागाचे गृहराज्यमंत्री झाले. दरम्यान राज्यात आलेल्या राजकीय भूकंपामुळे शिवसेनेत दोन गट पडले आणि ते एकनाश शिंदे यांच्याबरोबर गेले. ते आजही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.