

Raigad Political News : रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला वाद आता शांत झाला असून तिढा देखील सुटला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले आहेत. सध्या ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबियांशी जुळवून घेताना दिसत आहेत. नुकताच गोगावले यांनी तटकरेंच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. याच मुद्द्यावरून शिवसेनेतच नाराजी नाट्य रंगले असून दळवी यांनी तटकरे यांच्यावर टीका केली होती.
या टीकेवर तटकरेंनी नाव न घेता नाराजी व्यक्त करणाऱ्या आमदार महेंद्र दळवींना टोला लगावला आहे. दोनच शब्दात त्यांनी दळवींच्या टीकेचा समाचार घेतला असून 'मैदानापासून दूर राहणाऱ्यांना मैदान कधी समजलं नाही', असे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा तटकरे विरूद्ध दळवी अशा संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ते अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यांचे निमित्ताने बोलत होते.
रायगडच्या राजकारणात एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील सघर्षाची आणि महायुतीतील मतभेदांची चर्चा होताना दिसत आहे. तर मात्र दुसरीकडे गोगावले तटकरेंशी जुळवून घेताना दिसत असून नुकताच त्यांनी तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गौरी-गणपतीचे दर्शन घेतले. या भेटीनंतर रायगडचे राजकारण चांगलेच तापले असून शिंदेंच्या शिवसेनेतच खटके उडताना दिसले.
या भेटीनंतर आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावले यांच्यावर निशाना साधत नाराजी व्यक्त केली होती. तसेच 'गणपतीबाप्पाचे दर्शन घेणे यात चुकीचं असं काहीच नाही. पण आम्ही केलेला संघर्ष आणि त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंनी घेतलेली ही भेट भूमिका चुकीचे आहे. यामुळे अशा गोष्टी गोगावलेंनी टाळाव्यात असा सल्ला देखील दळवींनी दिला होता.
दळवींनी तटकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप करत त्यांनी अनेकांना रस्त्यावर आणून सोडले. यामुळेच आमची राष्ट्रवादी पक्षावर नाही तर तटकरे कुटुंबावर नाराजी असल्याचे दळवी यांनी म्हटले होते. यानंतर गोगावले यांनी या वादावर पडदा पडल्याचे सांगत आमदारांची नाराजी दूर केल्याचा दावा केला.
या सर्व घडामोडीनंतर तटकरे यांनी कोणाचेही नाव न घेता आता टोला लगावला आहे. मैदान आपल्याला सर्व काही गोष्टी शिकवितो, या मैदानातून सांधिक व खेळाडूवृत्तीची भावना जोपासली जाते. पण मैदानापासून दूर राहणाऱ्यांना मैदान कधी समजलं नाही, मग वेगवेगळ्या पध्दतीच्या भावना व्यक्त करत असतात, असे म्हटले आहे.
याचवेळी तटकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांची आठवण काढत आदरणीय शरद पवार यांनी विविध पदावर कार्यरत राहून क्रिडा क्षेत्राला योगदान दिले असे सांगितले. तर महाविद्यालयीन जीवनात क्रिडा क्षेत्रातूनच मैदानाची सांधिक व खेळाडू वृत्ती मिळाली असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.