Raigad Politics : 'राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के', तटकरेंचे श्रीवर्धन मतदारसंघाबाबत मोठं वक्तव्य; जम्बो कार्यकारिणी नियुक्त

Sunil Tatkare Statement On Shrivardhan constituency : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. माजी तालुकाध्यक्ष आणि उद्योजक दर्शन विचारे यांनी पक्ष सोडत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे) मध्ये प्रवेश केला होता.
Sunil Tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : रायगड जिल्ह्यात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष आता पक्षांमधील फोडाफोडीच्या राजकारणापर्यंत पोहोचला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच रायगडमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला.

मंत्री अदिती तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या श्रीवर्धनमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. हा मतदारसंघ आजही आणि उद्याही राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील शांत झालेला वाद पुन्हा उफाळून आला आहे. पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याबाबत राजकीय तडजोड झाल्याची चर्चा होती. यावरून आमदार महेंद्र दळवी नाराज झाले होते. ते आजही तटकरे यांच्यावर टीका करताना दिसतात. नुकत्याच माणगाव येथील पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी तटकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दरी कधीही मिटणार नसल्याचे विधान करत तटकरे स्वार्थी बुद्धीचे असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Sunil Tatkare
Raigad Politics : गोगावले, थोरवे, दळवी अन् अख्ख्या शिवसेनेपासून सुटका मिळणार? तटकरेंकडून रायगडच्या विभाजनाचा नवा डाव चर्चेत

यानंतर श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष आणि उद्योजक दर्शन विचारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत घरवापसी केली. मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशाच्या निमित्ताने शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करत सुनील तटकरे यांना राजकीय शह देण्याची तयारी केल्याची चर्चा रंगली होती.

या सर्व घडामोडींनंतर सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ आजही आणि उद्याही राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. महायुतीमधील काही नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला फारसे महत्त्व न देता, रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आपले कार्य सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, तटकरे यांनी त्यांना क्षमा करा, अशी प्रतिक्रिया दिली. वरिष्ठ स्तरावरील टीका-टिप्पणीला फारसे गांभीर्याने न घेता, पांडुरंगाने त्यांना क्षमा करावी, असेही ते म्हणाले. दळवी यांच्या ‘तटकरे कुटुंबाला विरोध, राष्ट्रवादीला नाही’ या विधानावर प्रतिक्रिया देताना, कोणाला कोणाचा विरोध असला तरी चालू द्या, असे तटकरे यांनी सांगितले. गेली 40 वर्षे रायगड जिल्ह्यात समर्पित भावनेने काम करत असल्याचे सांगत, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले उद्दिष्ट असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. मतदारसंघातील जनता सुज्ञ असून, कोणत्याही मतदाराला गृहीत धरू नये, असा सल्लाही त्यांनी राजकीय विरोधकांना दिला.

Sunil Tatkare
Raigad Politics : रायगडात अवघ्या आठवडाभरातच राजकीय चित्र बदलले; राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग! शिवसेनेसह अन्य पक्षांना धक्का

राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारणी नियुक्ती

दरम्यान आदिती तटकरे यांचा मतदार संघ असलेल्या श्रीवर्धनमध्ये शिवसेनेने प्रवेशाची मुसंडी मारल्यानंतर आता राष्ट्रवादी देखील सक्रिय झाली आहे. श्रीवर्धनमध्ये मेळावा घेत जम्बो नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या मेळाव्याला खा. सुनिल तटकरे यांची विषेश उपस्थिती होती. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने रिक्त झालेली पद भरत श्रीवर्धन तालुक्यात 70 ते 80 जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.