

Sindhudurg News : कणकवली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात दंड थोपटत नगराध्यक्ष झालेल्या संदेश पारकर यांनी भाजपचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून संदेश पारकर यांच्या राजकीय चालींची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.
कणकवली नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी पारकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद सोडले होते. पण त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. त्यांनी शिंदेंसह ठाकरेंच्या जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र करत 'कणकवली पॅटर्न'च्या माध्यमातून शहर विकास आघाडी स्थापन करून भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते स्वतः कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तसेच सत्ताही शहर विकास आघाडीची आली. यानंतर या विजयाची राज्यभर जोरदार चर्चा झाली.
मात्र त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. तसेच त्यांनी मुंबईत थेट शिंदे यांची भेटदेखील घेतली. शहराच्या विकासासाठी आपल्याला कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागणार, असे संकेतदेखील त्यांनी दिले होते. यामुळे त्यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र अद्याप त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही. अशातच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. ही भेट राणे यांच्या कणकवलीतील 'ओम गणेश' या निवासस्थानी झाली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी संदेश पारकर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना भविष्यात आमदार, खासदार व्हा, असे आशीर्वाद दिले. याच शुभेच्छांमुळे आता नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या भेटीत संदेश पारकर यांनी शहराच्या विकासकामांबाबत राणेंशी चर्चा करत विकासनिधीची मागणी केली. तर राणे यांनी शहराच्या विकासासाठी निधी देऊ, असेही आश्वासन दिले आहे. दरम्यान, शहरभर लागलेल्या “भावी खासदार संदेश पारकर” या बॅनरची चर्चा रंगली असून, त्यावरूनच राणे यांनी पारकर यांचा चिमटा काढला असावा, असेही बोलले जात आहे. या बॅनरवर प्रतिक्रिया देताना, "या बाबत पक्ष नेतृत्वाने विचार करायला हवा," असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, "हे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले असून, आपल्याला याबद्दल काहीच माहिती नाही. मात्र ही कार्यकर्त्यांची भावना आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र एकनाथ शिंदे यांची भेट, त्यानंतर आता नारायण राणे यांची भेट, तसेच लागलेले "भावी आमदार, खासदार" असे बॅनर आणि मिळालेले आशीर्वाद यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येईल, असे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.