Palghar Assault Case : पालघरमध्ये ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याकडून ७१ वर्षीय आजोबांना मारहाण? व्हिडिओ व्हायरल; तक्रारीत गंभीर आरोप

Palghar Yuva Sena leader assault allegation : पालघरमध्ये एका वृद्धाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून ही मारहाण ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याकडून झाल्याचे समोर आले आहे.
Palghar Assault Case; Yuva Sena leader Omkar Bhanushali
Palghar Assault Case; Yuva Sena leader Omkar BhanushaliSarkarnama
Published on: 
Updated on: 

Palghar News : पालघरमधील रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता याच जिल्ह्यात एका ७१ वर्षीय वृद्धाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण केल्याचा आरोप असलेला ओंकार भानुशाली हा ठाकरे गटाच्या युवासेनेचा वाडा शहर उपसचिव आणि शहरप्रमुख असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, तो तक्रारदार वृद्धाचा नातू असल्याचं सांगितलं जात आहे.

या प्रकरणी दिलीप महेंद्र भानुशाली यांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नवरात्री मंडळाला दिलेल्या तांदळावरून झालेल्या वादातून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात असून, या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागलं आहे.

पालघरमध्ये पुन्हा खळबळ

पालघरमधील रिलीफ रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण आणि कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणामुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत आली होती. या घटनेची उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर शिवसेनेकडून सात जणांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यालाही अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यात डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.

Palghar Assault Case; Yuva Sena leader Omkar Bhanushali
Palghar Assault Case : शिवसेनेचा पुन्हा राडा, तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल होताच एकनाथ शिंदेंची नगरसेविका फरार

दरम्यान, डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातही शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केल्यानंतर त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर आता पालघरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर वृद्धाला मारहाण केल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

तांदळावरून वाद

तक्रारदार दिलीप महेंद्र भानुशाली हे सेवानिवृत्त असून शेती आणि इतर व्यवसाय करत असल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. नवरात्री उत्सवासाठी त्यांनी मंडळाला तांदळाच्या तीन गोण्या दिल्या होत्या. मात्र, मंडळाने जेवणासाठी त्यापैकी दोनच गोण्या वापरल्या आणि एक गोणी वापरली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर मंडळाचे सदस्य असलेल्या आपल्या दोन चुलत नातवांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप दिलीप भानुशाली यांनी केला आहे. तसेच, या प्रकरणी विचारणा करणाऱ्या आपल्या मुलीलाही फोनवरून शिवीगाळ करण्यात आल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

स्टीलच्या दांड्याने मारहाणीचा आरोप

दिलीप भानुशाली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अजय भानुशाली आणि ओंकार भानुशाली यांनी त्यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांच्यावर बाटली फेकून मारली. त्यानंतर मारहाण करत त्यांना सुचक डेअरी आणि सुचक खानावळ परिसरापर्यंत नेण्यात आल्याचा आरोप आहे. तिथेही स्टीलच्या दांड्याने मारहाण करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या मारहाणीत डोक्याला जखमा झाल्या असून शरीरावर मुकामार लागल्याचं दिलीप भानुशाली यांनी तक्रारीत म्हटलं आहे. याशिवाय, गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील सोन्याचं कडं गहाळ झाल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

Palghar Assault Case; Yuva Sena leader Omkar Bhanushali
Palghar Hospital Assault Case : शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार? पालघर रुग्णालय राडा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, जखमी गोविंदाला...

ठाकरे गटाकडून कारवाई होणार?

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालघरमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या युवासेनेशी संबंधित पदाधिकाऱ्यावर वृद्धाला मारहाण केल्याचा आरोप झाल्याने संबंधित पक्षाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागलं आहे. तसेच, या प्रकरणात पोलीस कोणती कारवाई करतात आणि ओंकार भानुशाली याला अटक होते का, याबाबतही उत्सुकता आहे. मात्र, मारहाणीचे आरोप आणि तक्रारीतील दावे यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com