

Ulhasnagar Political News : उल्हासनगर महापालिकेतील सत्तासमीकरणावरून महायुतीत फुट पडण्याची शक्यता असून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून हे वाद आणखी चिघळले आहेत. यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली असून महापालिकेतील सत्ते बाहेर पडण्यासह आगामी निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करण्याची भूमिका जाहीर केली आहे. तसेच या स्वीकृत निवडीविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देखील भाजपने दिला आहे. यामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून भाजप आणि शिवसेनेत वाद झाला होता. तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रखडलेल्या सात स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया बुधवारी (ता. ३०) पूर्ण करण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी शिवसेनेचे 05 आणि भाजपचे 02 उमेदवार स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषित केले.
या घोषनेवरूनच आता नवा वाद सुरू झाला असून भाजपने या प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे. भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया यांनी सर्व 37 नगरसेवक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर आयलानी यांनी उल्हासनगर पालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले.
तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करण्याची भूमिका जाहीर केली आहे. यावेळी आयलानी यांनी, ज्या लोकांनी आम्हाला जखमा दिल्या त्यांचे काम कोण करेल का? असा सवाल केला. ज्याला सर्व नगरसेवकांनी देखील नाही करणार अशा घोषणा दिल्या. या घोषणाच एक प्रकारे खासदार शिंदे यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकणाऱ्या असल्याचे बोलले जात आहे.
महापौरांचे पती कमलेश निकम यांच्यावर देखील भाजप आमदारांनी जोरदार टीका केली. तसेच या स्वीकृत निवडीविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देखील भाजपने दिला आहे. यामुळे उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना युतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे सध्याचे चित्र आहे. तर या वादावर आता महायुतीचे नेते कोणता तोडगा काढतात याकडे स्थानिक नेत्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.