

Raigad News : दुष्काळ आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रायगड जिल्ह्यात लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या वनराई बंधारा अभियानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे कौतुक करत राज्यभरात ‘रायगड पॅटर्न’ राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवघ्या पाच दिवसांत जिल्ह्यात २०० वनराई बंधारे उभारण्यात आल्याने अभियानाला गती मिळाली आहे.
मात्र, एका बाजूला जलसंधारणाच्या लोकचळवळीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक होत असताना दुसरीकडे रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची सभा आलिशान रिसॉर्टवर आयोजित करण्यात आल्याने खर्चाच्या मुद्द्यावरून टीका होत आहे.
पाच दिवसांत २०० वनराई बंधारे
राज्यात दुष्काळी परिस्थितीची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, तळा आणि महाड या चार तालुक्यांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील उर्वरित दहा तालुकेही दुष्काळग्रस्त घोषित करावेत, अशी मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वनराई बंधारा अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांसह विविध शासकीय विभागही या उपक्रमात सहभागी झाले आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या आणि मातीचा वापर करून कमी खर्चात वनराई बंधारे उभारले जात आहेत.
वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढवणे आणि भूजलपातळी सुधारण्यास हातभार लावणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियानाचे कौतुक केले. तसेच, अशाच पद्धतीने ‘रायगड पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचे आवाहन केले.
स्थानिक सहभागातून जलसंधारणाची लोकचळवळ
पालकमंत्री भरत गोगावले यांनीही वनराई बंधारा अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कमी खर्च, स्थानिक साहित्याचा वापर आणि ग्रामस्थांचा पुढाकार ही या उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या जलप्रकल्पांबरोबरच स्थानिक पातळीवरील अशा उपक्रमांतूनही पाणीटंचाईवर मात करता येऊ शकते. हा प्रयोग राज्यभर पोहोचल्यास जलसंधारणाची व्यापक लोकचळवळ उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेची सभा रिसॉर्टवर; खर्चावरून टीका
वनराई बंधारा अभियानाचे राज्यस्तरावर कौतुक होत असतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या आयोजनावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. दुष्काळी परिस्थितीत खर्चावर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा असताना जिल्हा परिषदेची सभा आलिशान रिसॉर्टवर आयोजित करण्यात आल्याने टीका होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील कर्नाळा परिसरातील कल्हे गावाच्या हद्दीत असलेल्या विसावा रिसॉर्टमध्ये दुपारी दीड वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संकटात असताना अशा ठिकाणी सभा घेण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्य शासनाकडून पाणी अडवण्यासाठी आणि जलसंधारणासाठी विविध उपक्रम राबविले जात असताना जिल्हा परिषदेच्या सभेच्या आयोजनावरून खर्चाच्या मुद्द्यावरून टीकेची झोड उठली आहे. वनराई बंधारा अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या रायगड जिल्ह्यातच जिल्हा परिषदेच्या सभेवरून वाद निर्माण झाल्याने हा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.