

Vishakha Raut Caste Validity Controversy News : मुंबईतील दादरसारख्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मध्यवर्ती भागात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून, माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलं आहे. राऊत यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला होता. यानंतर आता त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी राबवायची, याबाबत महापालिकेच्या कायदा विभागाकडून छाननी सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे त्यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी विशाखा राऊत यांनी सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले. प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर ते योग्य नसल्याचा निष्कर्ष पडताळणी समितीने काढला होता. ज्यानंतर त्यांचे नगरसेवकपद जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आले होते. यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला विजयी घोषित केले जाऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर तसे झाल्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लॉटरी लागणार असून, महापालिकेत त्यांचा एक नगरसेवक वाढू शकतो.
आता जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यानंतर महापालिकेच्या कायदा विभागाकडून देखील पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी राबवायची, याबाबत छाननी सुरू करण्यात आली आहे. तर राऊत यांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा देण्याची भूमिका घेतली आहे. समितीच्या आदेशाविरोधात विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे ९० दिवसांच्या आत अपील करण्याची तरतूद आहे. त्यानंतर आवश्यक असल्यास न्यायालयात दाद मागण्याचा पर्यायही राऊत यांच्यासमोर आहे.
दरम्यान, राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे नगरसेवकपदही रद्द करण्याचा विषय महापालिका सभागृहात येण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रक्रियेत कायदेशीर बाबींची पूर्तता आणि पुढील न्यायालयीन आव्हान लक्षात घेऊनच निर्णय घेण्याची भूमिका पालिका प्रशासन घेऊ शकते. राऊत यांनी आपल्याकडे कुणबी समाजाचे जुने पुरावे असल्याचा दावा केला आहे.
राजकीय परिणाम काय?
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद कायम राहते की रद्द होते, याकडे दोन्ही शिवसेनांचे लक्ष लागले आहे. राऊत यांचे पद रद्द झाल्यास संबंधित जागेवर पुढील कायदेशीर आणि निवडणूक प्रक्रिया काय असेल, याबाबतही महापालिका प्रशासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्या संदर्भात पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि नगरसेविका विशाखा राऊत यांनी आज (ता. २४) पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली.
कायदा विभागाकडे लक्ष
एकीकडे पालिकेच्या कायदा विभागाची चाचपणी, तर दुसरीकडे न्यायालयीन लढाईची तयारी, अशी गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाली आहे. राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत पालिकेचा कायदा विभाग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.