बारामती लोकसभा निवडणूक ( Baramati Lok Sabha Election 2024 ) राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार पक्ष ) अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अजित पवार यांच्या पक्षातील नेते बारामतीत येऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत आहेत. अशीच टीका कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. यानंतर आता शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची लायकी काढली आहे.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी कृषीमंत्री मुंडे ( Dhananjay Munde ) बारामती मतदारसंघात प्रचार करत होते. यावेळी शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वापरलेल्या 'बाहेरच्या पवार' या विधानावरून धनंजय मुंडे यांनी टीका केली. "सुनेला परकी म्हणता, तुमच्या घरात देखील लेकी आहेत. एक निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही जर सुनेला परकी म्हणत असाल, तर एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये. तुम्ही इतकं निगरघट्ट कसं झाला की सुनेला परके म्हणू लागलात," अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याबद्दल एका वृत्तवाहिनीने शरद पवार ( Sharad Pawar ) यांना प्रश्न विचारल्यावर ते संतापल्याचे पाहायला मिळाले. उद्योन्मुख तरूण दिसतो म्हणून विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली. पण, ते माझ्यावर आणि कुटुंबावर हल्ले करत आहेत, अशी नाराजी शरद पवार यांनी धनंजय मुंडेंबाबत व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले, "त्यांची ( धनंजय मुंडे ) लायकी नाही. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी दिली, तर त्यांना फिरणं मुश्किल होईल. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग या सगळ्या गोष्टी मी आता बोलू इच्छित नाही. त्यांना एक लहान कुटुंबातला उद्योन्मुख तरूण दिसतो म्हणून विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली. जनतेची नाराजी होती. हे सगळं माहिती असतानासुद्धा ते आता माझ्यावर आणि कुटुंबावर हल्ले करत आहेत. त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही. शेवटचा उल्लेख त्यांच्याबद्दल माझ्याकडून होईल."
महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत जनतेत सहानुभूती आहे, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. याबद्दल प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी म्हटलं, "बघूया मतदान आहे. यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. मी महाराष्ट्रात फिरतोय आणि ज्या पद्धतीनं सभांना प्रतिसाद मिळतोय, तो मला पक्ष वाढीच्या दृष्टीनं आणि आम्ही घेतलेल्या भूमिकेशी सुसंगत वाटतो."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.