Education Department : शिक्षण विभागाचा मोठा दणका, राज्यातील २,९४० शाळा रडारवर! बोगस पटाचा 'खेळ' संपणार?

Student Verification : राज्यात पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गांची पटपडताळणी करण्यात आली. या तपासणीत २५ ते ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित असलेल्या २,९४० शाळा आढळल्या.
Maharashtra education department student verification order
Maharashtra education department student verification orderSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : राज्यातील शाळांमध्ये कागदोपत्री विद्यार्थी दाखवून शासकीय योजनांचा लाभ लाटणाऱ्या 'बोगस' कारभाराला आता शिक्षण विभागाने चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पटपडताळणीत धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर, शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांची पुन्हा एकदा कसून पटपडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शेकडो शाळांचे धाबे दणाणले आहे

तब्बल ६३९ शाळांमध्ये १०० टक्के विद्यार्थी अनुपस्थित, तर १,२९८ शाळांमध्ये ५० ते ९९ टक्के विद्यार्थी गैरहजर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शाळांच्या पटावर विद्यार्थ्यांची संख्या नेमकी किती आणि प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थी किती असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्यात पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गांची पटपडताळणी करण्यात आली. या तपासणीत २५ ते ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित असलेल्या २,९४० शाळा आढळल्या. त्यापुढे ५० ते ९९ टक्के अनुपस्थिती असलेल्या १,२९८ शाळा, तर एकाही विद्यार्थ्याची उपस्थिती नसलेल्या ६३९ शाळांची नोंद झाली. या आकडेवारीने शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती आणि शासकीय नोंदींच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने पुन्हा पटपडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी पटपडताळणीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गैरहजर आढळलेल्या शाळांची फेरतपासणी केली जाणार आहे. तसेच एप्रिलमध्ये पटपडताळणी न झालेल्या शाळांचाही या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.

पटावर विद्यार्थी, वर्गात मात्र गैरहजेरी!

विद्यार्थ्यांची संख्या सरकारी नोंदीत आणि प्रत्यक्ष शाळेतील उपस्थिती यात मोठी तफावत असल्यास त्याची कारणे शोधण्याची जबाबदारी आता शिक्षण विभागावर आली आहे. विद्यार्थीसंख्येच्या नोंदींच्या आधारे शाळांना मिळणाऱ्या सुविधा, शिक्षकांचे नियोजन आणि शैक्षणिक संसाधनांचे वाटप होत असल्याने या फेरपडताळणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थीसंख्येतील अनियमितता असल्यास तीही या तपासणीत उघड होण्याची शक्यता आहे.

Maharashtra education department student verification order
Education Department SOP : खासगी शाळांच्या मनमानीला बसणार चाप! प्रवेश, फी अन् गणवेशाबाबत शिक्षण विभागाचे कडक नियम!

एप्रिलच्या तपासणीतही गंभीर चित्र

राज्यात ११, १५ आणि २२ एप्रिल २०२६ रोजी राज्यस्तरीय पटपडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर आकडेवारीचे विश्लेषण करताना मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे समोर आले. आता पुन्हा तपासणीचे आदेश दिल्याने शाळांच्या पटावरील विद्यार्थीसंख्या आणि प्रत्यक्ष उपस्थितीचा ताळमेळ तपासला जाणार आहे. या फेरपडताळणीतून शाळांमधील विद्यार्थीसंख्येचे वास्तव समोर येणार की नोंदीतील त्रुटींचा नवा धक्कादायक आकडा उघड होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra education department student verification order
Sinhgad Education Society : सिंहगड शिक्षण संस्थेची सीबीआय, ईडी मार्फत चौकशी होणार, कोर्टाने दिले आदेश!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.