- दीपा कदम
राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांपाठोपाठ महापालिकांवरही सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काही ठिकाणी महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिलेली कडवी लढतही महत्त्वाची आहे. पुढच्या काळात त्यांना हे राजकीय स्थान टिकवायचे असेल तर अस्मितेच्या जोडीला विकासाचा ठोस कार्यक्रम घेऊन जनतेपुढे जावे लागेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कौल सत्ताधारी पक्षाच्या बाजुने झुकणारे असतात, हे गृहीतक महानगरपालिका निवडणुकांनी पुन्हा अधोरेखित केले. राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांपाठोपाठ महापालिकांवरही सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काही ठिकाणी महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
मुंबई महापालिकेचा इतिहास पाहिला तर भाजपची प्रगती थक्क करणारी आहे. यावेळच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी ठरली. प्रादेशिक पक्षांचा प्रभाव कमी केल्याशिवाय भाजपचा विस्तार होऊ शकत नाही, हा भाजपचा जुना आणि यशस्वी ‘फॉर्म्युला’ पुन्हा कामी आलेला दिसतो.
या निकालांनी महाराष्ट्रातील प्रबळ प्रादेशिक पक्षांच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मात्र मुंबईत शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला आवाज कायम ठेवला असून पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्ष जमिनीवर कायम राहिला आहे. पक्षफुटीनंतर ‘नेते सोडून गेले, पण शिवसैनिक माझ्यासोबत आहेत’ असे उद्धव ठाकरे आवर्जून सांगत होते तो विश्वास शिवसैनिकांनी सार्थ ठरवला. ठाकरेंची हक्काची ‘व्होट बँक’ कायम तर राहिलीच; पण त्यामध्ये वाढदेखील झाली आहे.
तर राज ठाकरे यांच्या मनसेने मागच्या निवडणुकीच्या तुलनेत कमी जागा लढवल्यानंतरही त्या तुलनेत त्यांची मते स्थिर राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील निवडणुका शिवसेना (ठाकरे), मनसेसारख्या प्रादेशिक पक्षांना ''मराठी अस्मिते''च्या भावनिक मुद्द्यावर निवडणूक लढवताना निवडणूक व्यवस्थापन, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि शाखांना कायम स्वरुपी जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने व्यग्र ठेवण्यासारखे कार्यक्रम हाती घ्यावे लागणार आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यातील दोन मोठे प्रादेशिक पक्ष फुटले, तेव्हापासून त्यांच्यासमोर भाजपच्या आक्रमक राजकारणासमोर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान होते. या आव्हानाचा सामना करताना दोन वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळाल्या. उद्धव ठाकरे यांनी भाजपशी थेट संघर्ष पत्करला, तर अजित पवार यांनी त्याच ‘आव्हानाशी’ गळाभेट घेतली. या रणनीतीचा परिणाम आता निकालांतून दिसत आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत उद्धव ठाकरेंनी आपली जमीन कशीबशी राखून ठेवली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे चित्र आहे. पक्षफुटीनंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवूनही स्थानिक पातळीवर मतदारांनी या नवीन समीकरणांना स्वीकारले नाही.
विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही पक्षांचा ''स्ट्राईक रेट'' प्रभावी होता. भाजपने 132 जागा जिंकून 85 टक्के स्ट्राईक रेट नोंदवला, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 जागांसह 72 टक्के आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागांसह 69 टक्के स्ट्राईक रेट राखला.
महापालिका निवडणुकीतही हे पक्ष मोठी कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळे निघाले. भाजप वगळता शिंदे आणि पवार या दोन्ही नेत्यांना स्थानिक पातळीवर संघर्ष करावा लागला. भाजपच्या पाठिंब्यावर विधानसभा जिंकणे सोपे असले, तरी स्थानिक पातळीवर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणे किंवा टिकवणे या प्रादेशिक पक्षांसाठी कठीण आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 13 महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली, परंतु त्यांना ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिका वगळता इतर कुठेही उल्लेखनीय यश मिळवता आले नाही. उलट, अनेक ठिकाणी त्यांना आपले जुने बालेकिल्ले गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेत 25 वर्षे शिवसेनेची सत्ता असताना, शिवसेनेने तिथे दुय्यम भूमिका स्वीकारली आणि भाजपसाठी रान मोकळे करून दिले.
मुंबई महापालिका निवडणुकीत 1938 आणि 1985 साली जनसंघाच्या 6 जागा निवडून आल्या होत्या. 1992 मध्ये पहिल्यांदा शिवसेना-भाजप युती झाली, मात्र एकही नगरसेवक निवडून आला नाही. त्यानंतर 1997 मध्ये 26, 2002 मध्ये 35, 2007 मध्ये 28, 2012 मध्ये 31 नगरसेवक युतीमध्ये निवडून आले. 2017 मध्ये मात्र शिवसेनेशिवाय स्वतंत्र लढल्यावर भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले. आता पुन्हा शिवसेनेसोबत युती असतानाही भाजपने 89 जागा जिंकून मुंबईत दबदबा निर्माण केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी किंवा तामिळनाडूमध्ये द्रविडी पक्ष ज्याप्रमाणे आपली अस्मिता जपतात, तशी जादू महाराष्ट्रात यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली आहे. मात्र मराठी अस्मिता, भाषेचा मुद्दा मराठी मतदारांसाठी पुरेसा ठरणारा नाही. मुंबईत आजही भाजपसमोर त्यांच्या पक्षविस्ताराच्या आड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष सर्वात मोठा अडसर ठरतो.
मात्र, भाजपने आता उत्तर भारतीय आणि गुजराती मतांसोबतच मराठी मतांमध्येही मोठी जागा निर्माण केली आहे. आकडेवारीनुसार, भाजपला 2017 च्या निवडणुकीत 227 जागा लढवल्यावर 13 लाख 94 हजार 464 मते (27.32 टक्के) मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यांनी 136 जागा लढवून 89 जागा जिंकल्या. तर 15 लाख 40 हजार 800 मते भाजपला मिळाली आहेत (28.20 टक्के).
मात्र भाजपपेक्षा शिवसेनेला मिळालेला जनाधार हा अधिक नोंद घेण्यासारखा आहे. 2017 मध्ये शिवसेनेला 227 जागा लढवून 14 लाख 43 हजार 939 मते मिळाली होती. पक्ष फुटीनंतरही शिवसेना ठाकरे पक्षाने 164 जागा लढवून 65 जिंकल्या आहेत. त्यांना 13 लाख 23 हजार 279 (24.22 टक्के) मते मिळाली आहेत. मनसेच्या 6 जागा निवडून आल्या असल्या तरी 3 लाख 32 हजार 960 मते त्यांना मिळाली आहेत.
शिवसेना पक्षाने 90 जागा लढवून त्यांच्या 29 जागा निवडून आल्या आहेत. त्यांना 6 लाख 98 हजार 289 ( 12.78 टक्के) मते मिळाली आहेत. शिवसेना ठाकरे आणि मनसे या युतीला मिळालेल्या मतांवरुन मुंबईत मराठी मताला दुहीचा शाप नसेल तर मराठी अस्मितेचे राजकारण टिकवण्यासाठी याही पुढे वाव असणार आहे.
मुंबई ‘कॉस्मोपॉलिटन’ शहर आहे, हे मान्य करावे लागेल. भाजपच्या कॉर्पोरेट धाटणीच्या निवडणूक व्यवस्थापनाला केवळ भावनिक घोषणांनी हरवणे अशक्य आहे. मतदानाच्या केवळ 8 दिवस आधी जाहीरनामा प्रसिद्ध करून किंवा शेवटच्या क्षणी नवे मुद्दे प्रचारात आणून काही साध्य होत नाही.
मुंबईकरांना आता भविष्याचे ठोस ‘व्हिजन’ हवे आहे. प्रादेशिक पक्षांना अस्तित्व टिकवायचे असेल, तर त्यांना सर्व भाषिकांचे पाठबळ आणि विश्वास मिळवावा लागेल आणि मुंबईच्या विकासाचा असा आराखडा मांडावा लागेल, जो केवळ अस्मितेवर आधारित नसेल. अन्यथा, येणाऱ्या काळात प्रादेशिक पक्षांची जागा बळकावण्याचा भाजपचा पूर्वतिहास आहेच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.