

SIR News : निवडणूक आयोगात तीनही आयुक्तांनी शनिवारी झालेल्या बैठकीत विशेष सखोल पुनर्तपासणी (एसआयआर) प्रक्रियेसाठी अंतिम मुदतवाढ दिली आहे. यात महाराष्ट्र आणि दिल्लीतील मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मतदार नोंदणीतील दावे आणि आक्षेप नोंदवण्यासाठी अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मतदारांना आता १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. तसेच नोटिसा, दावे आणि आक्षेपांवरील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दिल्लीतही अशीच सवलत देण्यात आली असून, तेथे दावे-आक्षेप नोंदणीसाठी ३० ऑक्टोबर तर प्रक्रिया पूर्णत्वासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
ज्या नागरिकांची नावे यादीत नोंदवलेली नाहीत किंवा तांत्रिक त्रुटींमुळे ज्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशा नागरिकांना आता ERO कार्यालयात जाऊन सुनावणीला हजर राहण्याची गरज भासणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. क्षेत्रासाठी ठरवून दिलेला संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) घरी जाऊन कागदपत्रे गोळा करणार आहेत. यामध्ये अपवादात्मक स्थितीतच सुनावणी घेतली जाणार असून तीदेखील शक्य तितकी ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाईल. वयोवृद्ध किंवा अनुपस्थित मतदारांच्या वतीने कुटुंबातील सदस्याला अधिकृत प्रतिनिधी म्हणून पाठवण्याची मुभाही देण्यात आली आहे.
फॉर्म ६ सोबत जोडण्यात येणारे घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले असल्याचेही आयोगाने या बैठकीत अधोरेखित केले. SIR कालावधीबाहेरील नोंदणीसाठी मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार लागू फॉर्म कायम राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले. मतदार यादी अद्ययावत आणि निर्दोष करण्यासाठी आयोगाकडून ही मुदतवाढ महत्त्वाची मानली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.