Manoj Jarange Patil : जरांगेंना सरकारने तिसऱ्यांदा परवानगी नाकारली; तरीही मुंबईकडे रवाना : ‘मरण आलं तरी चालेल, मी जाणारच’ म्हणत ठाम निर्धार

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत आंदोलनासाठी तिसऱ्यांदा परवागनी मागितली होती.
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morchasarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे गेल्या १८ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. गत दोन दिवसांपासून त्यांनी उपचार घेणेही बंद केले आहे. याच दरम्यान त्यांनी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. पण त्यांनी आंदोलनासाठी केलेले दोन अर्ज पोलिसांनी फेटाळले आहेत, त्यानंतरही जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशात आता तिसरा अर्जही पोलिस प्रशासनाने फेटाळला आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी याबाबत माहिती दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी ५ हजार जणांच्या आंदोलनाला परवानगी मागितली होती. मात्र, कायदा-सुव्यवस्था आणि मागील आंदोलनाचे परिणाम लक्षात घेता प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर पाटील यांनी ५ ते ५० लोकांना आंदोलनासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. शेवटी आपण एकटाच मुंबईला जाणार, अशी घोषणा केली. परवानगी मिळावी यासाठी त्यांनी तिसऱ्यांदा अर्ज केला होता. आता या अर्जालाही पोलिसांनी नकार दिल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली.

गणेशोत्सवामुळे सरकारचा मुंबईत येण्यास विरोध

भरत गोगावले यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या काळात जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात. त्यामुळे या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे, असे गोगावले यांनी स्पष्ट केले. मात्र, परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील मुंबईत आले तर सरकार म्हणून परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचे गोगावले यांनी म्हटले. “मनोज जरांगे मुंबईत आले तरी सरकार म्हणून जे काही सामोरं जायचं आहे, ते आम्ही जाऊ,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha
Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांकडून मराठा समाजाचा मोर्चा स्थगित, एकटेच मुंबईला जाणार

आता कॅबिनेटमध्ये चर्चा; सरकार पुढे काय करणार?

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत मनोज जरांगे यांच्या मुंबईत सुरू करणार असलेल्या आंदोलनावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री यावर चर्चा करतील. त्यानंतर काय करायचं आणि पुढे कसं जायचं, याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गोगावले यांनी दिली. त्यामुळे जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर आता सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

‘मरण आलं तरी चालेल, पण मी जाणारच’

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनीही आपली भूमिका आक्रमकपणे स्पष्ट केली आहे. आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली असली तरी आपण मागे हटणार नसल्याचे त्यांनी म्हटले. “आता मरण आलं तरी चालेल. कोण गोळ्या घालतंय पाहू, पण मी जाणारच,” असे म्हणत जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

त्यामुळे एकीकडे पोलिस प्रशासनाकडून आंदोलनाला परवानगी नाकारली जात असताना दुसरीकडे जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

फडणवीसांची पहिलीच थेट भूमिका

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रथमच जरांगे यांच्या आंदोलनावर थेट भूमिका मांडली आहे. “मनोज जरांगेंच्या जवळजवळ सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. सगळ्या!” असे फडणवीस यांनी म्हटले. काही मागण्या न्यायालयीन प्रक्रियेत असून त्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “या मागण्या पूर्ण करण्याकरता न्यायालय आहे किंवा इतर संविधानिक पद्धती आहेत. त्याचा अवलंब केल्याशिवाय मागण्या मान्य होऊ शकत नाहीत,” असे फडणवीस यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha
Manoj Jarange Patil: ‘एक भाकर समाजासाठी’! जरांगेंच्या आंदोलनासाठी नाशिककरांनी घेतली भोजनाची जबाबदारी

सरकारने चर्चेची दारे कधीही बंद केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यघटनेच्या चौकटीत असलेल्या मागण्या पूर्ण करण्याची सरकारची तयारी आहे; मात्र कायदा आणि न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांच्या बाहेर जाऊन निर्णय घेता येणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आता जरांगे पाटील मुंबईत पोहोचल्यास सरकार त्यांना कशा पद्धतीने सामोरं जाणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होणार आणि फडणवीसांच्या भूमिकेनंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com