Dharashiv Politics : सत्ताधारी महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही पक्षांमध्ये पक्ष वाढीच्या नावाखाली एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. परभणीत मेघना बोर्डीकर यांना डोकेदुखी ठरणारे माजी आमदार विजय भांबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्यानंतर आता धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार राहुल मोटे यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांमुळे राहुल मोटे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडून अजित पवारांकडे जाणार याची चर्चा धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हा प्रवेश झाला. शरद पवार यांच्या पक्षाला हा अजित पवारांकडून दिलेला आणखी एक धक्का समजला जात आहे. या पक्षप्रवेशानंतर अजित पवार यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बेरजेच्या राजकारणाच्या धोरणानुसार आपण हे करत आहोत, असे स्पष्टीकरण दिले.
जातीभेद, धर्मपंथ न बाळगता एकत्र काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले. सत्तेच्या विरोधात जाऊन विकास कामे होत नसतात, सत्तेत राहून जनतेची कामे होत असतात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आमच्या पक्षाला बेरजेचे राजकारण करत यश मिळवण्याचा आणि आपला पक्ष वाढवण्याचा संपूर्ण अधिकार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. (NCP) भूम- परंडाचे विद्यमान शिवसेना आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत सध्या नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.
पक्षापासून आणि नेत्यांपासून अंतर राखून असलेले तानाजी सावंत मंत्रीपद न मिळाल्याने प्रचंड नाराज असल्याचे बोलले जाते. दरम्यान प्रकृती अस्वस्थ असल्याने तानाजी सावंत काही दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली. तानाजी सावंत यांची नाराजी दूर करण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे समजते.
राष्ट्रवादी कमबॅक करणार..
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांकडे जाण्याचा निर्णय घेत पक्ष प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याचा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे. कधीकाळी माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील, त्यांचे चिरंजीव तुळजापूरचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यामुळे संपूर्ण धाराशिव जिल्हा हा राष्ट्रवादीमय झाला होता.
परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि जिल्ह्यात बळकट असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती क्षीण झाली. महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले यश पाहता पक्षफुटी नंतर शरद पवार यांची साथ देणारे अनेक नेते आता अजित पवारांकडे जात आहेत.
परभणीमध्ये माजी आमदार विजय भांबळे यांच्या पक्षप्रवेशानंतर आता धाराशिवमध्ये राहुल मोटे यांनी देखील तुतारी सोडून हाती घड्याळ बांधल्याचे चित्र आहे. अजित पवार यांना भूम- परंडा मतदारसंघांमध्ये हक्काचा माणूस भेटल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत नाराज असताना राहुल मोटे यांचा अजित पवारांनी करून घेतलेला पक्षप्रवेश शिंदे सेनेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.