BJP News : भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नवीन प्रभारी व सहप्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाने २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी संघटनात्मक जबाबदाऱ्यांची घोषणा केली आहे. या नियुक्त्यांमध्ये मिझोरमची जबाबदारी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे देण्यात आली आहे.
भागवत कराड यांचा एप्रिल २०२६ मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणूनचा कार्यकाळ संपला होता. एक उच्चशिक्षित खासदार आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांना पक्षाकडून दुसऱ्यांदा राज्यसभेवर संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू पक्षनेतृत्वाने रामराव वडकुते यांना संधी दिली. राज्यसभेतील कार्यकाळ संपल्याच्या सहा महिन्यानंतर पक्षाने त्याच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक, महापौर, विधानसभेची उमेदवारी, प्रदेश चिटणीस, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अशी पदे भुषवलेल्या भागवत कराड यांची एप्रिल २०२० मध्ये अचानक लाॅटरी लागली. कराड यांना थेट राज्यसभेवर घेण्यात आले. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये पक्षाने त्यांच्या आणखी एक मोठी जबाबदारी टाकली. कराड यांना थेट केंद्रात अर्थ खात्याचे राज्यमंत्री पद मिळाले.
मंत्री म्हणून जुलै २०२१ ते जून २०२४ असा त्यांचा कार्यकाळ होता. ९ जून २०२४ रोजी स्थापन झालेल्या मोदी सरकारमध्ये मात्र त्यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. राज्यसभा खासदार म्हणून ३ एप्रिल २०२० ते २ एप्रिल २०२६ असा त्यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून पाठवायच्या खासदारांमध्ये कराड यांना पुन्हा संधी मिळेल अशी अपेक्षा होती.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल, असे वाटत असताना राज्यातील राजकीय समीकरण आणि जातीय समतोल साधण्यासाठी पक्षाने कराड यांना थांबण्यास सांगीतले. पक्षादेश शिरसावंद्य मनात कराड यांनी स्वतःला पक्ष कार्यात झोकून दिले होते. अखेर खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षाने आता त्यांच्यावर थेट मिझोरम राज्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे.
मिझोरम हे ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य आहे. येथील राजकारणात स्थानिक आदिवासी समाज, ख्रिश्चन बहुसंख्य लोकसंख्या, म्यानमारमधील संघर्षामुळे निर्माण झालेले निर्वासितांचे प्रश्न आणि राज्याची विशेष घटनात्मक ओळख याला महत्त्व आहे.
मिझोरममध्ये सध्या झोराम पीपल्स मूव्हमेंट पक्षाची सत्ता आणि लालदुहोमा हे मुख्यमंत्री आहेत. ८ डिसेंबर २०२३ रोजी ते सत्तेवर आले. विधानसभेच्या ४० पैकी २७ जागा त्यांच्या पक्षाने जिंकल्या होत्या. निर्वासितांसाठी अन्न, निवारा आणि आरोग्य सुविधा, शिक्षण व रोजगाराच्या संधी, राज्याच्या मर्यादित अर्थसंकल्पावर वाढणारा ताण, केंद्र सरकारकडून मदत आणि निर्वासितांच्या व्यवस्थापनाबाबत समन्वय, आदी या सरकारसमोरील आव्हाने आहेत.
भाजपाची राजकीय ताकद किती?
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत झोराम पीपल्स मूव्हमेंट पक्षाने सर्वाधिक २७ जागा जिंकत सत्ता हस्तगत केली होती. तर विरोधी पक्ष एमएनएफला दहा जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजप मिझोरम विधानसभेत केवळ दोन आमदार निवडून आले आहेत. तर काँग्रेसने एक जागा जिंकत इथे खाते उघडले होते.
भाजपाने या राज्यात संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. भागवत कराड यांची मिझोरमच्या प्रभारी पदी केलेली निवड त्याचा भाग आहे. कधी काळी देशात फक्त दोन खासदार असलेल्या भाजपाने २०१४ मध्ये केंद्रात बहुमतासह सत्ता मिळवली. आता मिझोरममध्ये दोन आमदार असलेल्या भाजपाला इथेही स्वबळावर सत्ता आणायची आहे. या वाटचालीत राज्याचे प्रभारी म्हणून भागवत कराड यांच्या कामगिरीचाही खारीचा वाटा असेल, अशा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.