माधव इतबारे
Chhatrapati Samhajinagar News : राज्य स्तरावरील नेत्यांनी महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढण्याचे जाहीरपणे सांगीतले. अजूनही त्यांची ही भूमिका कायम असली तरी दुसरीकडे मात्र स्थानिक पातळीवरील नेते स्वबळाची भाषा करताना दिसत आहेत. काल राज्यातील अ ते ड वर्ग महापालिकांना प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये चार प्रभागांचा एक वार्ड असावा, असा पुर्वीपासून भाजपाचा आग्रह होता. आता प्रत्यक्षात तसेच होणार असल्याने हे भाजपचे स्वबळाच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे बोलले जाते.
भाजपच्या (BJP) या खेळीचा फटका महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेसह, राष्ट्रवादी व महाविकास आघाडीलाही काही प्रमाणात बसू शकतो. नगरसेवक होण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांचा खर्च ही या नव्या प्रभाग रचनेनंतर वाढणार आहे. एकूणच प्रभाग रचना ही भाजपाच्या पथ्यावर पडणार, असे चित्र आहे. महापालिका निवडणुकीसाठी चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचे आदेश काढून तीन वॉर्डांच्या प्रभागासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेची (शिंदेसेना) भाजपने कोंडी केली आहे.
अपक्षांसह छोट्या पक्षांनादेखील याचा मोठा फटका बसणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी ही पहिल्यांदाच प्रभागनिहाय निवडणूक होत आहे. (Municipal Corporation) महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू आहे. सुरवातीला कोरोना संसर्गामुळे व नंतर ओबीसी आरक्षणामुळे महापालिकेची निवडणूकच लांबणीवर पडली. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनासह निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू होताच सर्वांत कळीचा मुद्दा म्हणजेच किती वॉर्डांचा एक प्रभाग असेल, याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. सत्ताधारी भाजप चार वॉर्डाचा एक प्रभाग यासाठी आग्रही आहे, तर शिवसेनेचा तीन वॉर्डांचा एक प्रभाग यासाठी आग्रह होता. मात्र, नगर विकास विभागाने सोमवारी चार वॉर्डांचा एक प्रभाग असा आदेश काढल्यामुळे निवडणुकी आधीच भाजपने शिवसेनेची कोंडी केल्याचे मानले जात आहे.
उमेदवारांचे बजेट चारपट वाढणार
चार वॉर्डांचा एक प्रभाग गृहीत धरल्यास सुमारे 40 हजार मतदारांच्या पुढे एका उमेदवाराला पोचावे लागणार आहे. म्हणजेच वॉर्डाच्या निवडणुकीसाठी जेवढा खर्च होत होता, त्यापेक्षा चारपट खर्च उमेदवारांना करावा लागणार आहे. चार वॉर्डांच्या प्रभागामुळे उमेदवारांच्या खर्चाचे कोटीच्या कोटी उड्डाणे होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. छोट्या पक्षांसाठी मात्र ही निवडणूक लढणे आर्थिकदृष्ट्या अवघड होणार आहे.
महापालिकेची पहिली निवडणूक 1988 मध्ये झाली होती. आतापर्यंत झालेल्या सहा निवडणुकांमध्ये यावेळी पहिल्यांदाच महापालिकेची प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहे. 2015 मध्ये प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्यासाठी तयारी करण्यात आली पण ऐनवेळी राज्य शासनाने वॉर्डनिहाय निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेला 32 जागा मिळाल्या होत्या.
मतांची विभागणी कोणाच्या पथ्यावर..
महापालिकेत 27 वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती होती. 2020 च्या शेवटी महापालिकेत ही युती तुटली. एमआयएम पक्षाचे प्राबल्य वगळता उर्वरित शहरात शिवसेना व भाजप अशी सरळ विभागणी झालेली आहे. भाजपचे नगरसेवक असलेल्या वॉर्डात शिवसेना वाढलेली नाही, तर शिवसेनेकडे असलेल्या वॉर्डात भाजप वाढलेली नव्हती. मात्र, आता शिवसेनेत फाटाफूट झाली आहे, तर भाजप एकसंघ असून, शहरात त्यांची ताकदही वाढलेली आहे.
दुसरीकडे शिवसेनेला (शिंदेसेना) एकसंघ शिवसेनेकडे त्यावेळी असलेले वॉर्ड मिळण्याची शक्यता असून, त्यात ठाकरे गटाचे देखील उमेदवार असतील व मतांची फाटाफूट होईल. त्यामुळेच भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील, असा भाजप नेत्यांचा अंदाज आहे. स्वबळावर निवडणूक लढल्यास महापालिका ताब्यात येऊ शकते, असा दावाही केला जात आहे.
महापालिका निवडणूक 2015 मधील बलाबल
एकूण वॉर्ड-115
शिवसेना-29
भाजप-23
एमआयएम-25
काँग्रेस-10
राष्ट्रवादी काँग्रेस-3
बसप-5
रिपाइं-1
अपक्ष-19 (शिवसेना-भाजप समर्थकांसह)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.