

Chhatrapati Sambhaji Nagar News, 18 Sep : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शासकीय ध्वजवंदन व हुतात्मा स्मारकाला अभिवादनाच्या कार्यक्रमात काल सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. अगदी दरवर्षी गैरहजर राहणारे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे भगवा कुर्ता घालून आले होते. हुतात्मा स्मारकाला अभिवादन आणि शासकीय ध्वजवंदनाचा जरी हा कार्यक्रम असला तरी इथे राजकारण्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार संदिपान भुमरे यांच्यावर टीका करताना आमचा खासदार मुका आहे, जनतेलाही आता आपली चूक झाली हे कळाले असल्याचा टोला लगावला. खैरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर मराठा आरक्षणाच्या उपोषणापासून दूर राहिलेल्या संदिपान भुमरे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेचा संदर्भही त्यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी संदिपान भुमरे हे सहाव्या क्रमांकावर होते, मराठा समाजाने मतदान केल्यामुळेच ते खासदार होऊ शकले असे जाहीर विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. हाच धागा पकडत खैरे यांनी आमचा खासदार मुका आहे असे म्हणत लोकसभेतही ते काही बोलत नाहीत अशी टीका एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केली.
चंद्रकांत खैरे हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून सलग चारवेळा निवडून गेले होते. परंतु 2019 च्या निवडणुकीत अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीने हिंदू मतांमध्ये झालेल्या विभाजनाचा फटका त्यांना बसला. एमआयएमचे इम्तियाज जलील तेव्हा लोकसभेवर निवडून गेले होते. 2019 मध्ये पराभव झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा चंद्रकांत खैरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली होती.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा लढा आणि त्यावरून मराठवाड्यासह राज्यातले तापलेले राजकीय वातावरण पाहता महायुतीकडून संदिपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. महायुतीने टाकलेले हे मराठा कार्ड चालले आणि मराठवाड्यात महायुतीची एकमेव छत्रपती संभाजी नगरची जागा निवडून आली. या निवडणुकीत चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. चार लाख 76 हजार 130 मते मिळवत संदिपान भुमरे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. तर एमआयएमचे इम्तियाज जलील तीन लाख 41 हजार 480 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल चिन्हावर लढलेले चंद्रकांत खैरे दोन लाख 93 हजार 450 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या पराभवाचे शल्य चंद्रकांत खैरे यांच्या मनात अजूनही आहे. यातूनच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खैरे यांनी संदिपान भुमरे यांच्या लोकसभेतील कामगिरीवर भाष्य करताना आमचा खासदार मुका आहे, अशी टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.