

Marathwada news : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी मराठवाड्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर होते. यादरम्यान भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथील एका शेतकऱ्याने त्यांच्यासमोर केलेल्या महसूल विभागासंदर्भातील एका तक्रारीने त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर प्रशासकीय मुजोरीवर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शुक्रवारी रात्री भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथे चंद्रशेखर बावनकुळे दुष्काळी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी नांजा येथील शेतकऱ्यांनी तलाठ्याच्या मनमानी कारभाराची कैफियत मांडली. तलाठी सार्वजनिक रस्ता अडवतो, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. यावर "ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलीच केस मी आज पाहतोय", असे आश्चर्य त्यांनी व्यक्त केले.
तलाठी रस्ता अडवू शकतो, हे मुंबईहून सहाशे किलोमीटर येऊन मला या गावात शिकायला मिळालं. अशा ‘कर्तबगार’ तलाठ्याचा १५ ऑगस्टला सत्कार करा अन् त्याला वाचविणाऱ्या अधिकाऱ्यांचाही सोबतच सत्कार करून टाका, अशा शब्दांत बावनकुळे यांनी आपल्याच खात्यातील या अजब कारभाराचे वाभाडे काढले.
महसूलमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी तलाठ्याच्या कारनाम्यांचा पाढाच वाचला. यावर संतापलेल्या मंत्र्यांनी जागेवरूनच जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांना फोन लावून जिल्हा प्रशासनाला फैलावर घेतले. ‘‘मी अजून दीड तास जालन्यामध्येच आहे. तोपर्यंत या तलाठ्याचा कशा पद्धतीने बंदोबस्त करता येईल, तो करा आणि मला त्वरित कळवा,’असा थेट अल्टीमेटम त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
गावातील गट क्रमांक १३२ आणि १०९ मधून जाणारा जुना बैलगाडीचा रस्ता तलाठी श्रीकृष्ण मधुकर कुलकर्णी यांनी चारी खोदून बंद केला असून ते आमची अडवणूक करत आहे, असा थेट आरोप नांजा शिवारातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रारी मार्फत केला होता. गेल्या ६-७ महिन्यांपासून रस्ता बंद असल्याने ५० हून अधिक शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत त्यांनी सांगितले. तलाठ्याची १०९ मध्ये स्वतःची जमीन आहे. सर्व रस्ता तयार झाला तरी त्याने केवळ त्याच्या शेताकडील रस्ता बंद केला. काही महिन्यांपूर्वी तहसीलदार पंचनाम्यासाठी आले तेव्हाही हा तलाठी गायब होता,असा संताप ग्रामस्थांनी केला.
या तक्रारीबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी विचारणा केली असता, "संबंधित तलाठ्याला पाच नोटीसा दिल्या, पण तो ऐकत नाही," अशी कबुली तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी दिली. यावर महसूल मंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त करत, अडवणूक करणाऱ्या या तलाठ्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
संबंधित तलाठी यापूर्वी लाचखोरीसह इतर प्रकरणांत दोनवेळा निलंबित झालेला आहे. हा काळा इतिहास समोर आल्यावर महसूलमंत्री बावनकुळे अधिकच आक्रमक झाले. "दोनदा निलंबित होऊनही सुधारणा न होणाऱ्या या तलाठ्याला आता थेट बडतर्फच करावे लागेल का?, असा सवाल बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. या घटनेमुळे महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.