

Chhatrapati Sambhajinagar News : महापालिकेच्या आतापर्यंत झालेल्या तीनही सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. मंगळवारी महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सभापतींनी मांडला. निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप आणि हाॅकर्सच्या मुद्यावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या ऋषीकेश जैस्वाल यांना उत्तर देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चुकीच्या पद्धतीने केलेला उल्लेख यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर महापौर समीर राजूरकर (Sameer Rajurkar) यांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर संताप व्यक्त केला. आतापर्यंत झालेल्या सगळ्याच सर्वसाधारण सभांमध्ये एमआयएमच्या नगरसेवकांचे वागणे हे बेशिस्तपणाचे आणि चीड आणणारे होते. हाॅकर्स यांच्यासाठी पंतप्रधान स्वनिधीमधून दिली जाणारी मदत सर्वच विक्रेत्यांना, फेरीवाल्यांना दिली जाते, असा मुद्दा ऋषीकेश जैस्वाल यांनी या विषयावरील चर्चे दरम्यान मांडला.
त्यावर पंतप्रधान हे स्वनिधी आपल्या खिशातून देत नाही, अशी उद्दाम आणि अवमानकारक भाषा एमआयएमच्या काही नगरसेवकांनी वापरली. त्याला मग भाजप-शिवसेना व इतर पक्षाच्या नगरसेवकांनीही उत्तर दिले आणि त्यातून सभागृहात गोंधळ उडाला. एकूण एमआयएमच्या नगरसेवकांचे सभागृहातील वर्तन हे बेशिस्त राहिले आहे. वारंवार समज देऊनही त्यांच्या वागण्यात बदल होताना दिसत नाहीये. मुळात एमआयएमच्या नगरसेवकांची बौद्धिक पातळीच कमी असल्याची टीका महापौर समीर राजूरकर यांनी केली.
महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सभागृहात गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. पण यातून विरोधी नगरसेवकांनी काही बोध घेतल्याचे दिसत नाही. सभागृहात आपल्याला जनतेचे प्रश्न, विकासाचे मुद्दे मांडण्यासाठी निवडून दिले आहे, याचा विसर एमआयएमच्या नगरसेवकांना पडला आहे. पीठासीन अधिकारी म्हणून अशा बेशिस्त नगरसेवकांवर कारवाई करण्याचा अधिकार माझा आहे.
पण अनेकदा आम्ही ती टाळली. यापुढेही एमआयएमच्या नगरसेवकांची सभागृहातील वर्तणूक अशीच राहिली तर महापालिकेच्या नियमानूसार निश्चित कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौरांनी दिला. कालच्या गोंधळानंतर सभा तहकूब केली नाही, तर राष्ट्रगीताने कामकाज संपवले. त्यानंतर महापालिका सभागृहातून बाहेर जाताना दोन्ही बाजूंनी घोषणा देण्यात आल्या. कोणी काय घोषणा द्याव्यात, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु यापुढे असे प्रकार सभागृहात खपवून घेणार नाही, असा इशाराही समीर राजूरकर यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.