

Beed political news : बीडच्या परळीमधील महा पशुधन एक्सपोचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशु संवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थित उद्घाटन झालं.
या एक्सपोमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी बीडच्या अनुषंगाने असलेल्या प्रलंबित मागण्यांची मांडणी करताना, देवेंद्र फडणवीस यांचा 'कामधेनू' असा उल्लेख केला. 'कामधेनू म्हटलं म्हणजे, आमच्या मनातील इच्छा देखील माहिती आहेत. त्यामुळे जास्त बोलणं नको,' असा म्हणत धनंजय मुंडे यांनी बरंच काही सांगून टाकलं.
बीडमधील (Beed) परळी इथं महा पशुधन एक्सपोचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मंत्री पंकजा मुंडे या वेळी उपस्थित होत्या. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी स्वागत केलं. धनंजय मुंडे यांनी स्वागत भाषणात मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांचं जोरदार कौतुक केलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर बीडमधील राजकीय गुन्हेगारी राज्यात चर्चेचा विषय ठरली.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी 'आकाचा-आका', हे वाक्य त्यावेळी खूप चर्चेत आलं. यातून रडारवर एकप्रकारे धनंजय मुंडे आले. पुढे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद गमवावं लागलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला न्यायप्रविष्ठ आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आता राजकारणात काहीसे पुन्हा सक्रिय झाले आहेत. महा पशुधन एक्सपोमध्ये स्वागत भाषणात त्यांनी बीडमधील विविध प्रलंबित विषयांची मागणी मांडताना देवेंद्र फडणवीस यांचा 'कामधेनू', असा उल्लेख केला.
आमदार धनंजय मुंडे म्हणाले, "देवाभाऊ आमच्या दृष्टीने तुम्हीच 'कामधेनू' आहात आमच्या इच्छा पूर्ण करणारे. परळी तीर्थक्षेत्र विकासासाठी अर्थ संकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करावी. परळीचा जिर्णोध्दार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्याला भरीव निधी द्यावा." सभागृहात दिलेला शब्द, थर्मल पॉवरच्या जागेवर सोलार प्रकल्प सुरू झाला आहे. देवाभाऊने यात पूर्ण लक्ष घातलं असून, तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू व्हावा, अशी मागणी मुंडेंनी केली.
पंचम द्वादश ज्योतिर्लिंग केंद्रीय प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा आणि प्रस्ताव तयार करण्यासाठी पाच कोटीचा निधी द्यावा. तसंच 11 पैकी नऊ प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्धता आहे. तसं प्रमाणपत्र आहे. प्रकल्प पाण्याची व्यवस्था करावी. आपण जलसंपदा मंत्री आहात, ती मागणी पूर्ण करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
धनंजय मुंडे एकापाठोपाठ मागण्यांचा सपाटा सुरू होता. तेवढ्यात त्यांना मागून चिठ्ठी आली आणि त्यांनी त्यांचे भाषण आटोपते घेतले. भाषणाच्या शेवटात, मुंडे यांनी त्यांच्या मनातील इच्छा सूचकपद्धतीने मांडली. ते म्हणाले, "मी अगोदरच त्यांना कामधेनू म्हटलं आहे. म्हणजे, त्यांना मनातील इच्छा देखील माहिती आहेत. त्यामुळे जास्त बोलणं नको, असा निरोप देखील आला आहे. आतापर्यंत दिलंत, त्याबद्दल आभार मानतो. पुढेही द्याल, ही अपेक्षा ठेवतो." असे बोलून मुंडे यांनी भाषण थांबले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.