Dharashiv Politics : ओमराजेंचा एकहाती किल्ला; तर अर्चना पाटलांना पालकमंत्री, 4 आमदार, माजी मंत्री- खासदारांची 'पॉवर'

Omraje Nimbalkar Vs Archana Patil News : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या मागे पालकमंत्री, चार आमदार, एक माजी मंत्री आणि एका माजी खासदारांचे पाठबळ होते. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी एकहाती किल्ला लढवला.
Archana Patil, Omraje Nimbalkar
Archana Patil, Omraje Nimbalkar Sarkarnaam

Dharashiv Loksabha Constituency News : लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे. उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार, याचा अंदाज मतमोजणीच्या दिवशी दुपारपर्यंत येऊ शकतो. महायुतीच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात चुरशीची लढत झाली.

लोकसभा मतदारसंघातील सहापैकी 5 आमदार महायुतीचे आहेत. महायुतीच्या या आमदारांसह एक मंत्री, माजी मंत्री, एका माजी खासदाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांची प्रतिष्ठा वाचणार की नाचक्की होणार, हे 4 जूनला सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे ठाकरे गटाचे आहेत. बार्शीचे राजेंद्र राऊत हे अपक्ष निवडून आलेले असले तरी भाजपशी त्यांची जवळीक आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे भूम-परंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटाचे आहेत.

तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे दोघेही भाजपचे आहेत. याशिवाय माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हे शिंदे गटात आहेत. या सर्वांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी ताकद लावली होती.

दुसरीकडे, महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली. महायुतीचा उमेदवार निश्चित होईपर्यंत त्यांनी मतदारसंघाची एक फेरी पूर्ण केली होती. धाराशिवचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, भूम-परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील, कळंबचे माजी आमदार दयानंद गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील यांच्या साथीने त्यांनी प्रचाराचा किल्ला लढवला.

त्यांच्यासोबत शिवेसेनेचे अन्य निष्ठावंत नेते, कार्यकर्तेही होते. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी सभा घेतल्या. गेल्या पाच वर्षांत लोकांशी ठेवलेला संपर्क, लोकांनी मोबाईलवर संपर्क साधून सांगितलेल्या अडचणी सोडवण्याचा केलेला प्रयत्न या मुद्द्यांवर त्यांच्या प्रचारात जोर देण्यात आला होता.

Archana Patil, Omraje Nimbalkar
Vijay Wadettiwar : 'मराठवाड्यात भीषण दुष्काळ असताना कृषिमंत्री शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून पळाले...'

'ही' संधी महायुतीच्या नेत्यांनी गमावली!

अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनीही सभा घेतल्या. याशिवाय चार आमदार, पालकमंत्री, माजी खासदारांचेही पाठबळ त्यांच्या मागे होते. महायुतीच्या या शक्तीसमोर खासदार राजेनिंबाळकर यांची शक्ती क्षीण वाटत होती, मात्र लोक त्यांच्यासोबत आहेत, असे दिसत होते. पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना सहानुभूती होती, हे कुणीही नाकारू शकत नाही. शिवाय, विकासाच्या मुद्द्यावर राजेनिंबाळकर यांची कोंडी करण्याची संधी महायुतीच्या नेत्यांनी गमावली.

प्रचार वैयक्तिक पातळीवर गेला आणि तो राजेनिंबाळकर यांना तसाच हवा होता. लोकांचे आलेले फोनकॉल उचलणे हा काय खासदाराचे काम असते का, असा प्रश्न महायुतीच्या प्रचारसभांमधून विचारला जाऊ लागला. राजेनिंबाळकर यांनी याच मुद्द्यावर विरोधकांना घेरून ठेवले. खासदारकीच्या पाच वर्षांत कोणती विकासकामे केली, हा मुद्दा लावून धरत राजेनिंबाळकरांची अडचण करण्यात महायुतीला म्हणावे तितके यश आल्याचे दिसले नाही. असे असले तरी प्रत्यक्षात निकाल काय लागणार, हे चार जूनला कळेल.

राजकारणात काहीही होऊ शकते...

बसवराज पाटील हे औशाचे माजी आमदार आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवर तेथून ते सलग दोनवेळा निवडून आले होते. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. काही महिन्यांपूर्वीच भाजपवासी झालेले पाटील आणि आमदार पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अर्चना पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी जोर लावला होता.

एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले बसवराज पाटील आणि माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हेही या निवडणुकीत एका व्यासपीठावरून प्रचार करताना दिसून आले. राजकारणात काहीही होऊ शकते, असे सतत म्हटले जाते. त्याची अनुभूती उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना या निवडणुकीच्या निमित्ताने आली.

Archana Patil, Omraje Nimbalkar
Gilbert John Mendonsa:मीरा भाईंदरच्या माजी आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पालकमंत्री, आमदार अन् माजी खासदारांची धडधड वाढणार

4 जूनच्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होईल. सुरवातीला टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. धाराशिव येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणाऱ्या मतमोजणीसाठी 1200 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, 500 पोलिसांचा तगडा बंदोबस्त असेल.

मतमोजणी दोन दिवसांवर आल्याने आता उमेदवारांची धडधडही अंतिम टप्प्यात आली आहे. उमेदवारांपेक्षा महायुतीसाठी काम केलेले चार आमदार, पालकमंत्री, एक माजी मंत्री आणि एका माजी खासदाराची धडधड अधिक वाढलेली असणार. लोकांनी आपल्यासा स्वीकारले की नाही, याची उत्कंठा त्यांना लागून राहिलेली असणार. चार जूनच्या दुपारपर्यंत ती कायम राहणार आहे. त्यानंतर काय होईल, यासाठी आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Archana Patil, Omraje Nimbalkar
Sanjay mandlik Vs Shahu Chhatrapati : कागल, चंदगड संजय मंडलिकांना तारणार? शाहु महाराजांना करवीर, दक्षिणमध्ये मताधिक्य...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com