

Dharshiv News : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर (SIR) जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या धाराशिव शहरातील तब्बल 27 हजार 65 मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. 242- उस्मानाबाद (धाराशिव) विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या शहरातील बूथ क्रमांक 289 ते 376 या 88 बूथमध्ये पूर्वी 91 हजार 806 मतदार होते. SIR नंतर प्रारूप यादीमध्ये ही संख्या 64 हजार 741 वर आली आहे. म्हणजेच शहरातील प्रत्येक 10 पैकी सुमारे 3 मतदारांची नावे यादीतून कमी झाली आहेत.
बूथनिहाय आकडेवारीच्या विश्लेषणातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील प्रत्येक बूथमधून सरासरी 308 मतदारांची नावे वगळली गेली आहेत. पूर्वी एका बूथमध्ये सरासरी 1,043 मतदार होते, ते आता 736 वर आले आहेत. 88 पैकी 39 बूथमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त, तर 5 बूथमध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार यादीबाहेर गेले आहेत.
स्थलांतरित मतदारांची संख्या सर्वाधिक
वगळलेल्या मतदारांमध्ये "कायम स्थलांतरित" म्हणून काढलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक, म्हणजे 10 हजार 925 इतकी आहे. त्याखालोखाल 7 हजार 675 मतदार "न सापडलेले किंवा गैरहजर" म्हणून, 5 हजार 35 मतदार "मृत" म्हणून, तर 3 हजार 370 मतदार "दुबार नोंदणी" म्हणून वगळण्यात आले आहेत. 60 मतदारांनी गणना फॉर्म नाकारल्याची नोंद आहे.
स्थलांतरित आणि न सापडलेले या दोन कारणांखालीच एकूण 18 हजार 600 मतदार, म्हणजे वगळलेल्यांपैकी तब्बल 69 टक्के मतदार कमी झाले आहेत. यामध्ये कामानिमित्त बाहेर गेलेले, तात्पुरते गावी गेलेले किंवा पडताळणीच्या वेळी घरी नसलेले पात्र मतदारही असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशां जुन्या पात्र मतदाराची नावे पुन्हा समाविष्ट करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या बूथना सर्वाधिक फटका
धाराशिव शहरातील बूथ क्रमांक 348 मध्ये सर्वाधिक 45.8 टक्के मतदार वगळले गेले आहेत. त्याखालोखाल बूथ 371 (45.2 टक्के), बूथ 343 (41.4 टक्के), बूथ 290 (40.8 टक्के) आणि बूथ 349 (40.3 टक्के) या बूथमध्ये जवळपास प्रत्येक दुसऱ्या मतदाराचे नाव यादीतून गेले आहे. बूथ 351, 295, 368, 301 आणि 337 मध्येही घटीचे प्रमाण 38 ते 40 टक्क्यांदरम्यान आहे.
संख्येच्या दृष्टीने बूथ क्रमांक 343 मधून सर्वाधिक 569 मतदार वगळले गेले. बूथ 368 मधून 564, बूथ 295 मधून 543, बूथ 371 मधून 516 तर बूथ 320 मधून 491 मतदारांची नावे कमी झाली आहेत. याउलट बूथ क्रमांक 350 मध्ये सर्वात कमी, म्हणजे 12.5 टक्के घट नोंदवली गेली.
बूथ क्रमांक 371 मधील स्थिती विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. येथील 1,142 पैकी 421 मतदार, म्हणजे 36.9 टक्के मतदार केवळ "न सापडलेले" म्हणून वगळले गेले आहेत. हे प्रमाण शहराच्या सरासरीच्या (8.4 टक्के) तब्बल साडेचार पट आहे. स्थलांतरित मतदारांचे सर्वाधिक प्रमाण बूथ 304 (29.9 टक्के), 295 (27.2 टक्के) आणि 372 (26.9 टक्के) मध्ये आहे, तर मृत मतदारांचे सर्वाधिक प्रमाण बूथ 360 (14.8 टक्के) मध्ये आहे.
प्रारूप मतदार यादीतील 12 हजार 964 मतदारांना पुन्हा नोटीस
दरम्यान, या SIR नंतर धाराशिव शहरात 64 हजार 741 मतदारांची नावे यादीत शिल्लक राहिली आहेत. या शिल्लक यादीमधील 12 हजार 964 मतदारांना किरकोळ त्रुटींच्या कारणामुळे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यादीत शिल्लक असलेल्या मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 20 टक्के आहे. सर्वाधिक 521 नोटीस बूथ क्रमांक 298 मध्ये, तर 385 नोटीस बूथ क्रमांक 330 मध्ये आहेत. बूथ 330 मधून SIR मध्ये आधीच 37.7 टक्के मतदार वगळले गेले होते.
नाव तपासण्याचे आवाहन
यादी स्वच्छ होणे आवश्यक असले, तरी या प्रक्रियेत एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक मतदाराने आपले नाव यादीत आहे की नाही, हे आपल्या भागातील BLO (बूथ स्तरीय अधिकारी) यांच्याकडे जाऊन तात्काळ तपासावे, असे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वगळलेल्या गेलेल्या पण पात्र जुन्या मतदारांची नावे मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करण्यासाठी नव मतदारांच्या फॉर्म 6 मुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
वगळलेल्या मतदारांची जबाबदारी कोण घेणार ?
सर्वात गंभीर बाब म्हणजे, न सापडलेले म्हणून 7 हजार 675 मतदार यांची नावे डिलिट केली आहेत. BLO ना सापडली नाहीत म्हणून त्यांना न विचारता, त्यांची संमती न घेता, त्यांची नावे डिलिट करणे हे कोणत्याही स्वरूपात, अन्याय करण्यासारखे आहे. आणि गंभीर स्वरूपाचा अपराध आहे. यात शेवटच्या स्तरातील नागरिक, मजूर,कामगार वर्ग, अशिक्षित ज्येष्ठ नागरिक, महिला स्थलांतरित मजूर, निराधार, अनाथ व्यक्ती यांच्यावर अन्याय झाल्याची शक्यता आहे. या 8 ते 10 टक्के पात्र पण वगळलेल्या मतदारांच्या जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.