

Dharashiv Zilla Parishad: धाराशिव जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे आता तातडीने निर्णय घेऊन त्याची अमलबजावणी युद्धपातळीवर केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेने मोठे पाऊल उचलेले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे म्हणून आता जिल्ह्यातील प्रत्येक गावात रात्री 7 ते 9 या वेळेत टीव्ही आणि मोबाईल बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील प्रत्येक गावात 'भोंगा' वाजल्यानंतर मोबाइल व टीव्ही बंद राहणार आहे.
या पूर्वी धाराशिव जिल्ह्यात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरुद्ध 'गुड मॉर्निंग' पथक काम करीत होते. त्याच धर्तीवर आता गावात शिक्षण निरीक्षक आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे विशेष पथक रात्री 7 ते 9 दरम्यान गस्त घालणार आहे. घरोघरी जाऊन टीव्ही बंद आहे की नाही आणि मुले अभ्यास करत आहेत का, याची खातरजमा हे पथक करणार आहे. या मंडळींचे वाढता 'स्क्रीन टाईम' आणि सोशल मीडियाच्या आहारी जात असलेल्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी वॉच असणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात रात्री 7 ते 9 या वेळेत टीव्ही आणि मोबाईल बाजूला सारून विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी पुढाकार घेत जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ कागदावर न ठेवता, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी 'ग्राऊंड लेव्हल' प्लॅनिंग केले आहे.
जिल्हयातील प्रत्येक गावात दररोज रात्री 7 वाजता मंदिरांवर किंवा ग्रामपंचायतीवर बसवलेले भोंगे वाजवले जाणार आहेत. हा भोंगा वाजताच घरातील टीव्ही बंद करून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे.
ग्रामपंचायतींमध्ये सुरु करणार सुसज्ज स्टडी रूम
धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेकडून पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या काळात मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सुसज्ज स्टडी रूम सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुटल्यानंतर देखील ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी आहेत, त्यांच्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. ग्रामीण भागातील मुलांची स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षांमधील कामगिरी सुधारणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.
धाराशिव जिल्हयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी दोन तास टीव्हीचा त्याग करावा. हे केवळ प्रशासनाचे काम नसून संपूर्ण समाजाचे योगदान आहे, असे आवाहन अर्चना पाटील यांनी केले आहे. दरम्यान, या निर्णयाचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत असले तरी, घराघरातील टीव्ही बंद करण्याच्या सक्तीवर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.